चंद्रपुर:कोरोनाचा संसर्ग व प्रादूर्भाव रोखणे करीता विविध गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदीचे आदेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ मार्च २०२०

चंद्रपुर:कोरोनाचा संसर्ग व प्रादूर्भाव रोखणे करीता विविध गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदीचे आदेश


चंद्रपुर/प्रतिनिधी:
ज्याअर्थी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. 

आणि ज्याअर्थी, आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना या विषाणुचे संसर्ग बाधीत रुग्ण आढळत आहेत, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासव्दारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. असे प्रवासी चंद्रपूर जिल्हामध्येही परदेश प्रवास करुन आलेले आहेत व बरेच प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे कोरोना या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्‌यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणुचे संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. 

अशा प्रवाशांमुळे कोरोना विषाणुचा संसर्ग जिल्हयात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यास्तव गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे, इत्यादी बाबी टाळणे अत्यावश्यक आहे. उपरोक्त प्रमाणे कोरोना विषाणुच्या प्रसाराचे माध्यम पाहता, सदर विषाणुची लागण एका संक्रमीत रुग्णाकडुन अन्य व्यकतीस/इसमास त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्‍यता विचारात घेता, डॉ. कुणाल खेमनार, अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोट कलम ग (c) व ड (m) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 43 अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन या आदेशाव्दारे मोठया प्रमाणात लोकांचा समुह एकत्र जमु न देण्यासाठी, संपूर्ण चंद्रपूर जिल्हयामध्ये घेण्यात येणा-या सभा, मेळावे, सामजिक कार्यक्रम, जत्रा,यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा, इत्यादीवर दिनांक 14 मार्च ते 31 मार्च 2020 पर्यंत बंदी लागू केली आहे.

 जत्रा, यात्रा, उरुस ई धार्मिक सामाजिक कार्यक्रमात पुजारी किंवा धर्मगुरु इत्यादींना विधिवत पुजा करण्यास तसेच खाजगी करावयाचे कार्यक्रम मोजक्या लोकांचे उपस्थितीत करण्यास बंदी असणार नाही. तसेच कौंटुबिक स्वरुपात करण्यास बंदी असणार नाही. परंतु या दोनही वाब किंवा वैदयकिय सुरक्षा पाळणे बंधनकारक राहील. यासाठी संबंधित तालुक्‍याचे तहसिलदार त्यांचे मुख्याधिकारी, नगर पालिका किंवा आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका यांची त्यां कार्यक्षेत्रातील अशा कार्यक्रमासाठी लेखी पुर्व परवानगी घ्यावी लागेल.सर्व शासकीय यंत्रणांना ही निर्देशीत करीत आहे.
 अशाप्रकारे सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा, इत्यादीच्या आयोजना संदर्भात कोणतीही परवानगी त्यांच्या स्तरावर देण्यास येऊ नये. त्याप्रमाणे जिल्हयातील सर्व तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी व- मुख्याधिकारी नगरपालिका/ परिषद व आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका यांना त्यांचे त्यां कार्यक्षेत्रात होणा-या अशा कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच फक्त विधिवत पुजा किंवा कौटुंबीक कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी प्राधिकृत करुन तसे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

या आदेशाचे किंवा संबंधित तहसिलदार किंवा मुख्याधिकारी किंवा आयुक्‍त यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन अश्या गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित संयोजकाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये कारवाई करण्यात येईल. यासाठी संबंधीत सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.