चावंड किल्ल्यावर सागवानी तोफगाडा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ फेब्रुवारी २०२०

चावंड किल्ल्यावर सागवानी तोफगाडा


जुन्नर / आनंद कांबळे
चावंड (ता जुन्नर )येथील चावंड किल्ल्यावर कित्तेक वर्ष असलेल्या एकमेव तोफेला सह्याद्री प्रतिष्टान व दुर्गप्रेमी यांच्या माध्यमातून उभारलेल्या लोकवर्गणीतून सागवानी तोफगाडा नुकताच बसविण्यात आला .

तसेच ह्या तोफेचा सन्मान सोहळा फर्जंद व फत्तेशिकस्तचे दिगदर्शक दिगपाल लांजेकर, महाराष्ट्राची लोकधारा फेम शाहीर बाळासाहेब काळजे पाटील, चावंड ग्रामपंचायत चे सरपंच रामा भालचिम या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित संपन्न झाला. याप्रसंगी सह्याद्रीप्रतिष्ठानचे दुर्गसेवक मोठ्या संखेने उपस्थित होते.

किल्ले चावंड वरील तोफेला पुन्हा एकदा तिचं मानाचं स्थान मिळवून देत असताना त्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येक दुर्गसेवकांसाठी हा एक आनंद सोहळाच होता. ह्या सोहळ्यासाठी मुंबई, कर्जत, मुरबाड, पुणे, चाकण, खेड, संगमनेर, मंचर, नारायणगाव, जुन्नर येथील दुर्गसेवक उपस्थित होते. सह्याद्री प्रतिष्ठान ही सेवाभावी संस्था गेल्या १२ वर्षांपासून घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा या ब्रीद वाक्याला स्मरून गडकोटांच्या संवर्धनासाठी अहोरात्र झटत आहे. संस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्र शासन दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत नऊशेहून अधिक दुर्गसंवर्धन मोहीम राबविल्या आहेत.


ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या व छत्रपतींची जन्मभूमी असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील किल्ले चावंड येथे एकमेव तोफ अनेक वर्षे कातळात गाडून ठेवलेली होती. अनेकजण किल्ल्यावर गेलेही. त्या प्रत्येकाने ती तोफ पहिली. काहींनी अगदी तिला लाथाडलेही असेल. काहींनी तर ती तुटकी असेल म्हणून हिणवलेही. पण त्या तोफेला मोकळा श्वास देऊन तिचं मानाचं स्थान तिला मिळवून द्यावेसे नाही वाटले. परंतु काही दुर्गप्रेमी मंडळींनी सह्याद्री प्रतिष्ठान च्या दुर्गसेवकांना ह्या तोफेची अवहेलना होत आहे अन तिला योग्य ते मानाचं स्थान मिळावं यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी हाक दिली. हि तोफ बाहेर काढण्यासाठी चावंड गावचे सरपंच व ग्रामस्थ मंडळी यांनीही सहमती दर्शविली. तसेच जुन्नर वन विभाग यांचेही विशेष सहकार्य लाभले असल्याचे निलेश जेजुरकर यांनी सांगितले

चौकट :- संस्थेच्या माध्यमातून स्वराज्याचे प्रवेशद्वार या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ९ किल्ल्यांवर ११ सागवानी लाकडी दरवाजे तसेच स्वराज्याचा तोफगाडा या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १० किल्यांवरील बेवारस पडलेल्या तोफांना ३० सागवानी तोफगाडे लोकसहभागातून जमा झालेल्या निधीतून बसविण्यात आले आहेत. किल्ले जंजिरा येथे कायमस्वरूपी राष्ट्रध्वज तिरंगा संस्थेच्या माध्यमातून लावण्यात आला आहे.


सोबत फोटो