कोरोना आजाराच्या दक्षतेसाठी चंद्रपुर शासकीय रुग्णालयात ४ बेड राखीव - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ फेब्रुवारी २०२०

कोरोना आजाराच्या दक्षतेसाठी चंद्रपुर शासकीय रुग्णालयात ४ बेड राखीव


चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने तयारी केली आहे. चंद्रपूरच्या नागरिकांनी यासंदर्भात घाबरून जाऊ नये, असा संदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिला असून गरज पडल्यास आवश्यक औषधोपचाराची उपाययोजना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भात खबरदारी घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे जिल्हा शल्यचिकित्सक तथा नोडल अधिकारी डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गेहलोत, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम व इतर अधिकारी उपस्थित होते.सदर सभेमध्ये प्रतिबंधक उपाययोजना व पूर्वतयारी म्हणून जिल्हास्तरावर चार खाटांचे विलगीकरण कक्ष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे स्थापित करण्याचे निश्चित झाले. त्यासाठी लागणाऱ्या उपचाराची साहित्य सामुग्री उपलब्ध करण्यात आली आहे.

 तसेच जिल्हा अंतर्गत सर्व आरोग्य संस्थेत या रोगाबाबतच्या जनजागृती करिता साहित्य प्रदर्शित करण्यात येत आहे.जिल्हास्तरावर तज्ञ समिती गठीत केलेली आहे. या तज्ञ समितीमध्ये भिषक,छाती रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, शल्यचिकित्सक ,बधीरीकरणतज्ञ, सूक्ष्म जीवशास्त्रतज्ञ यांचा समावेश करण्यात आला आहे.

कोरोना आजाराचे पुढील प्रमाणे लक्षण आहे.बरेच दिवस राहणारी सर्दी, खोकला,घसा खवखवणे, श्वास घ्यायला त्रास होणे, फुप्फुसात पसरलेला निमोनिया ,असे लक्षण आढळल्यास काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या आजारांसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे साबण व पाणी वापरून हात स्वच्छ धुणे, शिंकताना खोकताना आपल्या नाकावर तोंडावर रुमाल धरणे, सर्दी फ्लू सारखे लक्षणे असल्यास लोकांशी निकटचा संपर्क टाळणे, मांस -अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घेणे, जंगली अथवा पाळीव प्राण्यांची निकटचा संपर्क टाळणे, सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकणे टाळणे, आदी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आव्हान यामध्ये करण्यात आले आहे.

चीनमधून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींची तपासणी विमानतळावरच करण्यात येत आहे. अशा व्यक्तींना वरीलपैकी लक्षणे नसल्यास त्यांना त्यांच्या घरी 14 दिवस निरीक्षण ठेवणे आवश्यक आहे. या दरम्यान त्यांना वरील लक्षणे आढळल्यास त्यांनी तत्काळ रुग्णालयात भरती व्हावे, चीनमधून स्थलांतरित झालेल्या व्यक्तींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे तात्काळ संपर्क साधावा. रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून स्वतः खबरदारी घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

 अशा पद्धतीचा कोणताही संशयित रुग्ण आढळल्यास दूरध्वनी क्रमांक 020-26127394 व टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अशा पद्धतीच्या कोणत्याही रुग्णाची उपस्थिती नाही. अशा पद्धतीचे लक्षण असणारेही कोणीही रुग्ण नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसून केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही व्यवस्था करण्यात आल्याचे देखील जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.