उद्यापासून चंद्रपुरात शेतकरी महोत्सव - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ फेब्रुवारी २०२०

उद्यापासून चंद्रपुरात शेतकरी महोत्सव

विविध विषयांवर चर्चासत्र, बचतगट, कृषी प्रदर्शन, मोफत आरोग्य शिबिर


चंद्रपूर : शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, ग्रामीण भागातील महिला बचतगट उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध व्हावी, लघुउद्योजकांना बळ मिळावे आणि ग्रामीण व शहरी भूमिपुत्रांमध्ये समन्वय वाढावा, या उद्देशातून शेतकरी महोत्सवाचे आयोजन चांदा क्लब मैदानावर ८ व ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध विषयांवर चर्चासत्र आणि बचतगट, कृषी प्रदर्शन आणि आरोग्य शिबिर आयोजित केले आहे.

८ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते चर्चासत्र, मोफत रोगनिदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी खासदार नरेश पुगलिया, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, तर मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ कृषी शास्त्रज्ज्ञ बाळकृष्ण जडे, भालचंद्र ठाकूर, तात्यासाहेब मत्ते उपस्थित राहणार आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कपाशी लागवड, व्यावसायिक शेतीचे व्यवस्थापन, गटशेती या विषयावर दुसरे चर्चासत्र होईल. तिसऱ्या सत्रात शेतकरी महोत्सव २०२० इ-बुकचे उद्घाटन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, राजेंद्र वैद्य, बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे राहतील. बळीराजा विशेषांक या इबुकचे प्रकाशन केले जाणार आहे. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर, तर अध्यक्षस्थानी महापौर राखी कंचर्लावार राहतील.

९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता भूपंसादन, जमीनीविषयक कायदे, यावर अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, बांबू लागवड उत्पादन यावर राहुल पाटील, वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान व शासनाकडून भरपाई यावर जे. डी. गहूकर, दुधाळ जनावरांचे आजार यावर डॉ. अंकिता रोडे, कृषी व आत्मा यंत्रणेच्या शेतीपयोगी योजना यावर कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, पशुसंवर्धन यावर डॉ. अविनाश सोमनाथे, बचतगटाचे ग्रामीण अर्थ व्यवस्थेत योगदान यावर गजानन ताजणे, ट्रॅक्टर आणि अवजारांची देखभाल यावर ज्ञानेश्वर थातेड मार्गदर्शन करतील.
समारोपी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर राहतील. यावेळी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, उपमहापौर राहुल पावडे, माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, देवराव भोंगळे यांची उपस्थिती राहणार आहे.

या महोत्सवाचा सर्व शेतकरी बांधवांनी व जनतेने लाभ घेण्याचे आवाहन आयोजन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
मेळाव्यात राहणार १६० स्टॉलमेळाव्यात कृषीपयोगी यंत्रसामुग्री, विविध खाद्यपदार्थ, शासकीय योजनांची माहिती, प्रदूषण जनजागृती, व्यसनमुक्ती, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक अशा वेगवेगळ्या विभागाचे स्टॉल राहणार आहेत. यात बचतगट व कृषी वस्तू प्रदर्शनी व विक्रीचे १२८ स्टॉल, विविध खाद्यपदार्थ २६ व विविध विषयांवर लाईव्ह प्रात्यक्षिक करून दाखविणारे ६ स्टॉल असे एकूण १६० स्टॉल महोत्सवात राहणार आहेत.