शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे वापरण्यावेळी काळजी घ्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ जानेवारी २०२०

शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे वापरण्यावेळी काळजी घ्यानागपूर, दि.29 : नागपूर विभागात सोयाबिन पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र 5 लक्ष 8 हजार 575 हेक्टर आहे. सोयाबिन पिकाखालील पेरणी क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे वाढणाऱ्या क्षेत्रासाठी जास्तीच्या बियाण्याची गरज भासणार आहे. उशिरा पाऊस व सोयाबिन पिकांच्या काढण्याच्या कालावधीतील अवेळी पाऊसामुळे सोयाबिन बियाणे उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम झालेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मागील दोन हंगामामध्ये प्रमाणित बियाणेची पेरणी करुन उत्पादित केलेले बियाणे, हे पुढील खरीप हंगाम-2020 साठी व्यवस्थितपणे राखुण ठेवणे गरजेचे आहे, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक श्रीमती प्रज्ञा गोळघाटे यांनी दिली.

सोयाबिन हे स्वपरागसिंचित पीक असल्याने व राज्यात पेरण्यात येणारे बियाणे सरळ वाणाचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयाबिन, हे बियाणे म्हणून शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित चांगल्या प्रतिच्या बियाण्यांची चाळणी करुन निवड करावी. सोयाबिन बियाण्याची बाहयावरण नाजूक व पातळ असल्याने त्याची हाताळणी काळजीपुर्वक करावी.

सोयाबिन बियाणे साठवण करण्यापूर्वी दोन व तीन दिवस उन्हामध्ये ताडपत्री किंवा सिमेंटच्या खळयावर पातळ पसरवून चांगले वाळवावे व बियाण्यांतील आद्रतेचे प्रमाण 9 ते 12 टक्केपर्यंत आणावे. सोयाबिन बियाणे साठवूण करण्यासाठी बियाण्याची घरगुती पध्दतीने उगवणशक्ती तपासावी आणि किमान 70 टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे योग्य पध्दतीने साठवूण करावे. वाळलेल्या बियाण्यातील शेंगा, फोलपटे, काडीकचरा, मातीखडे इत्यादी काढूण ते स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या, नवीन पोत्यात साठवूण ठेवावे.

सोयाबिन बियाणे हवेतील आद्रर्ता लवकर शोषूण घेत असल्यामुळे साठवणुकीचे ठिकाण थंड ओलविरहीत व हवेशिर असले पाहिजे. साठवुणकीसाठी प्लॉस्टिक पोत्याचा वापर करु नये. बियाणी साठवतांना त्याची थप्पी 7 फुटापेक्षा जास्त असणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणे 100 किलोच्या पोत्यांमध्ये भरलेले असल्यास 4 पोत्यांपेक्षा जास्त व 40 किलोच्या पोत्यांमध्ये भरलेले असल्यास 8 पोत्यांपेक्षा जास्त मोठी थप्पी लावू नये अन्यथा सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडून बियाणे फुटून त्याची उगवणशक्ती कमी होते. पोत्यांची थप्पी जमिनीपासून 10 ते 15 सें.मि. उंचीवर लाकडी फळयांवर लावावी. पोत्यांची रचना उभ्या आडव्या पध्दतीने करावी म्हणजे हवा खेळती राहून बियाण्यांची गुणवत्ता व उगवणशक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होते.

आवश्यकतेनुसार बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये किटकनाशक व बुरशीनाशकाचा वापर करावा. तसेच उंदराचा उपद्रव टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. सोयाबिन बियाण्यांच्या पोत्यांची हाताळणी व वाहतूक काळजीपूर्वक करावी व पोती उंचावरुन आदळली जाणार नाही याची काळजी घ्यावी.

खरीप हंगाम 2020 मध्ये सोयाबिन उपलब्धतेची व्याप्ती वाढावी व सोयाबिन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी शेतकरी बांधवांनी घरचे सोयाबीन बियाणे वापरण्यावेळी काळजी घ्यावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक श्रीमती प्रज्ञा गोळघाटे यांनी केले आहे.

******