वर्धा जिल्हयातील मंगेशी मून ठरली पारधी समाजातील ७० मुलांची माय - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ जानेवारी २०२०

वर्धा जिल्हयातील मंगेशी मून ठरली पारधी समाजातील ७० मुलांची माय

उमेद "संकल्प" प्रकल्पाला सरपंचांची भेट


नागपूर /प्रतिनिधी:


पारधी वंचित उपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्याचा प्रयत्न रोठा (जि. वर्धा) येथील मंगेशी मून यांनी केला आहे. पारधी तांडा तसेच निराधार मुलांसाठी वसतिगृहाची उभारणी मंगेशी यांनी केली. मुलांच्या शिक्षणासाठी त्या प्रयत्नशील आहेत. स्वतःच्या कृषी पर्यटन केंद्रातून मंगेशी मून यांनी आर्थिक नियोजन केले आहे.
पारधी तांड्यावरील वंचित मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने झपाटलेल्या मंगेशी यांच्या संकल्पनेला आई, वडिलांचे देखील सहकार्य मिळाले.

वंचित कुटुंबातील मुलांकरिता वसतिगृहाची सोय केल्यानंतर ते मुख्य प्रवाहात यावेत याकरिता शाळा प्रवेश गरजेचा होता. परंतु भटक्‍या, निरश्रीतांकडे आधार कार्ड किंवा कोणतेही निवासी, जन्माचे दस्तऐवज नव्हते. ते दस्तऐवज तयार करून त्यांना रोठा गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश मिळवून देण्यात आला.

मंगेशी मून यांनी उभारलेल्या संकल्प प्रकल्पामध्ये सध्या एकूण ७० मुले आणि मुली आहेत. पारधी वस्तीवरून मुला, मुलींना प्रकल्पावर आणणे सोपे नव्हते. पालक मुला-मुलींना सोडण्यास तयार नव्हते. परंतु मुला, मुलींचे शैक्षणिक भविष्य घडविण्यासाठी हा प्रकल्प कसा फायदेशीर ठरेल याबाबत मंगेशी यांनी पालकांना पटवून दिले.
घरच्या शेतीवर वंचित पारधी मुलांसाठी मंगेशी मून यांनी संकल्प वसतिगृह प्रकल्प राबविला आहे.या प्रकल्पाला मुंबईसह राज्याच्या विविध भागांतील पर्यटक मंगेशी मून यांच्या प्रकल्पाला भेट देतात.

या प्रकल्पाला चांप्याचे सरपंच अतिश पवार ,आदिवासी विकास परिषदचे विदर्भ अध्यक्ष बबन गोरामन , अनिल पवार , राहुल राजपूत , रंजित भोसले या सामाजिक कार्यकर्त्यांनी "संकल्प" प्रकल्पाला भेट दिली.