नाशिक येथील जागतिक कृषी महोत्सवास विदर्भातून शेतकरी जाणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ जानेवारी २०२०

नाशिक येथील जागतिक कृषी महोत्सवास विदर्भातून शेतकरी जाणार
नागपूर/ प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेला ' जागतिक कृषी महोत्सव २०२० ' सत्र ९ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग ( दिंडोरी प्रणीत ) आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दि . २३ ते २७ जानेवारी२०२० दरम्यान जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात कृषी विषयक स्टॉलच्या व सेमिनारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी देश - विदेशातील विविध तज्ञांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे .

या कार्यक्रमाचा भूमिपूजन सोहळा प . पू . गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दि . १४ जाने . रोजी डोंगरे मैदान , गंगापूर रोड , नाशिक या ठिकाणी पार पडला . या महोत्सवाचे आयोजक श्री . आबासाहेब मोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की , शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने शेतकऱ्यांना समर्थ व स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात . या अंतर्गत दरवर्षी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीच्या कार्यक्रमास दि . २३ जाने . रोजी कृषी दिंडीने सुरुवात होईल . १२ बलुतेदारांचे एक आदर्श गाव तसेच बांबूचे भव्य दालन हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे . दरवर्षीप्रमाणे भव्य शेतकरी वधू - वर परिचय मेळावा अंतर्गत ' कन्यादान पुण्य महान ' हा नाविन्यपूर्ण उपक्रम होत आहे , तसेच या कार्यक्रमात राज्यभरातील बेरोजगार तरुणांसाठी शेतीपूरक व्यवसायासाठी ' Agricultural Business Hub ' हा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा उपक्रम सुरु होत आहे . या उपक्रमाचा सर्व बेरोजगार शेतकरी तरुणांनी लाभ घ्यावा , असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले . कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये : १ ) शेतीच्या विकासासाठी " कमी खर्च - जास्त उत्पन्न " या उपक्रमांतर्गत कमी पाण्यात व कमी खर्चात जास्त उत्पन्न या विषयी देश - विदेशातील विविध तज्ञांचे , संशोधकांचे मार्गदर्शन व चर्चासत्र तसेच दरवर्षीप्रमाणे विशेष सत्राअंतर्गत ' बांबू शेती व त्यावर आधारित उद्योग - व्यवसाय ' याविषयी तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र . २ ) सुमारे २५०० शेतकरी एकाच वेळी मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकतील असे भव्य दालन व व्यासपीठ. ३ ) सामान्य शेतकरी ते मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत शेती उपयोगी नवनवीन तंत्रज्ञान, यंत्रसामग्री यांचे प्रदर्शन व माहिती देण्यात येईल.