ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणे आवश्यक :श्री.संजीव कुमार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ जानेवारी २०२०

ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणे आवश्यक :श्री.संजीव कुमार

मुंबई/प्रतिनिधी:

'प्रशासनात प्रत्येक अधिकारी हा जनतेस बांधिल असतो. त्यामुळे महावितरणमध्ये प्रत्येकाने ग्राहकहित समोर ठेऊन काम केले पाहिजे. ग्राहकाला विश्वासात घेऊन जनतेशी संबंधित कामाच्या सोप्या पद्धती विकसित केल्यास प्रत्येक योजना यशस्वी होऊ शकते. यासर्व बाबी  महावितरणमधील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने राबवता आल्या. यामुळे वीज क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल करता आले. म्हणूनच महावितरणमध्ये काम करणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता.' अशा भावना मावळते महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव कुमार यांनी व्यक्त केल्या. 

श्री. संजीव कुमार यांची नुकतीच राज्याच्या विक्रीकर विभागाचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यानिमित्ताने आयोजित निरोप समारंभास उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. असीमकुमार गुप्ता हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानिर्मिती कंपनीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक श्रीमती शैला ए. होत्या. तर संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू, संचालक(वाणिज्य) श्री. सतीश चव्हाण, संचालक(वित्त) श्री. जयकुमार श्रीनिवासन, संचालक (मा.सं.) ब्रिगेडियर(सेवानिवृत्त) श्री. पवन कुमार गंजू यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. संजीव कुमार पुढे म्हणाले, 'राज्यात प्रत्येक नागरिकाला किफायत व गरजेएवढी वीज उपलब्ध झाली पाहिजे. त्याकरिता आपण बांधिल आहोत. आपल्या  महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांत प्रचंड क्षमता आहे. आपल्या क्षमतांची पुनर्बांधणी केल्यास त्यात अधिक गती येईल. याकरिता सिस्टम बेस्ड अँप्रोच असणे गरजेचे आहे.' यावेळी प्रधान ऊर्जा सचिव असीमकुमार गुप्ता यांनी ग्राहक सेवेत डिजिटलायझेशन महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषण महानिर्मिती कंपनीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक श्रीमती शैला ए. यांनी केले. 

यावेळी संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू, संचालक(वाणिज्य) श्री. सतीश चव्हाण, संचालक(वित्त) श्री. जयकुमार श्रीनिवासन, संचालक (मा.सं.) ब्रिगेडियर श्री. पवन कुमार गंजू यांनी मनोगत व्यक्त केले.  तर प्रकाशगड व क्षेत्रीयस्तरावर कार्यरत वरिष्ठ अधिकारी, विविध संघटना प्रतिनिधी यांनी श्री संजीव कुमार यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन सूत्रसंचालन मुख्य अभियंता श्री. भुजंग खंदारे यांनी केले. या कार्यक्रमास यावेळी महानिर्मितीचे संचालक (संचालन) श्री. चंद्रकांत थोटवे, महापारेषणचे  संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे व मुख्यालयातील सर्व कार्यकारी संचालक, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.