त्रासदायक ठरलेल्या क्रीडा स्पर्धा बंद करून नवरत्न स्पर्धेचा विस्तार करावा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ जानेवारी २०२०

त्रासदायक ठरलेल्या क्रीडा स्पर्धा बंद करून नवरत्न स्पर्धेचा विस्तार करावा

पुरोगामी शिक्षक समितीची मागणी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
पुरोगामी शिक्षक साठी इमेज परिणाम
दरवर्षी जि प चंद्रपूर अंतर्गत बिट ते जिल्हा स्तरापर्यंत शालेय बालक्रीडा तथा सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येतात.या स्पर्धेसंबंधाने स्पर्धेत आलेल्या अनुभवानुसार जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे पुढील वर्षी पासून या क्रीडा स्पर्धा बंद करण्यात याव्यात आणि यातील काही आवश्यक स्पर्धा नवरत्न स्पर्धेत जोडण्यात याव्यात. अश्या आशयाचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले.

सदर स्पर्धेच्या अनुषंगाने प्रशासन शिक्षक संघटनेची सभा घेते मात्र दिलेल्या सूचना वा तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून कुठलीही सोडवणूक वा भूमिका घेतली जात नाही. जिल्हा भरातून क्रीडा स्पर्धेबाबत आलेल्या अडचणी पुढील प्रमाणे आहेत, क्रीडा स्पर्धेसाठी साधारणता 60 हजार ते 80 हजार रु खर्च येतो.जि प 20 हजार निधी उपलब्ध करून देते.यातुन पेंडाल आणि स्टेशनरी ही होत नाही. जि.प. किमान 60 हजार रुपये निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे पण देत नाही, विध्यार्थ्याना ने आण करण्यासाठी खाजगी वाहन वापरू नयेत अशी सूचना दिली जाते. प्रशासनाने प्रत्येक गावात शासकीय वाहन वा बस उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. दरवर्षी शिक्षक ऑटो वा खाजगी वाहनाने विध्यार्थ्याना स्पर्धास्थळी नेत असल्याच्या बातम्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करून शिक्षक वर्गाची बदनामी करण्यात येते. वाहनाचा अपघात झाल्यास सर्वस्वी शिक्षकांना दोषी धरल्या जाते, स्पर्धे दरम्यान विध्यार्थ्याना दुखापत होते. गंभीर दुखापत होऊन उपचाराचा खर्च 50 हजार ते लाखा पर्यंत जातो. प्रशासन या उपचाराची जबाबदारी घेत नाही आणि पालक शिक्षकांवर तुटून पडतात. विध्यार्थ्याचा विमा काढून प्रशासन या उपचाराचा खर्च उचलायला तयार नाही, उद्घाटन समारंभाला पदाधिकारी नेहमीच उशिरा येतात. 

संध्याकाळी 6:30 वाजता उद्घाटन समारंभ पार पडल्याचे उदाहरण आहे. अशा वेळी विध्यार्थ्याना वेठीस धरण्याची बाब समोर येते. याची जबाबदारी कुणीही घेत नाहीत उलट शिक्षकांवर बेशिस्तीचे ताशेरे ओढले जातात. स्पर्धे दरम्यान गावकरी वा प्रेक्षकांकडून शिक्षकांना मारहाण,शिवीगाळ केली जाते. कोणतेही पदाधिकारी वा प्रशासन याची जबाबदारी घेत नाहीत. एका तालुक्यात केंद्रप्रमुख ,शिक्षकाला मारहाण, एका तालुक्यात गावकर्यानी खेळच होऊ दिले नाही, एका तालुक्यात मारहाणीत एक पालक गंभीर जखमी होऊन आय.सी.यु. मध्ये दाखल अशा अनेक घटना घडल्या आहेत. यावर प्रशासन कोणतीच भूमिका घेत नाही.

 सांस्कृतिक कार्यक्रम दिवसा घेत असाल तर गावकरी बहिष्कार टाकू अशी भूमिका गावकर्यानी घेतली. रात्री 3 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडावे लागतात. कडाक्याच्या थंडीचा, रात्रीचा विचार न करता विद्यार्थ्यांना वेठीस धरले जाते. गावकऱ्यांना समजवायला प्रशासन कमी पडते. काही अनुचीत प्रकार झाल्यास शिक्षकाला निलंबित केले जाते, या क्रीडा स्पर्धेतील प्रमाणपत्रांचा पुढे चालून विध्यार्थ्याना कुठेही उपयोग होत नाहीत. अतिरिक्त गुण मिळत नाहीत. जिल्हा स्तराच्या पुढे या स्पर्धा आणि खेळाडू जात नाहीत मग स्पर्धेचे औचित्य काय?
 या क्रीडा स्पर्धे दरम्यान 3 दिवस शाळा बंद असतात. विध्यार्थी नसतानाही शिक्षकांना क्रीडास्थळी उपस्थित राहावे लागते. विध्यार्थ्याचे यात मोठे शैक्षणिक नुकसान होते. मुली व महिला शिक्षिका यांच्यासाठी प्रसाधन शौचालय व निवासाची सोय तोकडी असते त्यामुळे त्यांची मोठी कुचंबणा होते हे एक ना अनेक प्रश्न या क्रीडा स्पर्धांवर उपस्थित झाले आहेत त्यामुळे पुढील वर्षी पासून या क्रीडा स्पर्धा बंद करण्यात याव्यात अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. 

या स्पर्धाऐवजी विद्यार्थी क्रीडा व सांस्कृतिक कलागुण वाढवण्यासाठी शालेय स्तरावर प्रत्येक शाळेत क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवासाठी किमान 5 हजार निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून शाळेतच या स्पर्धा घेता येतील. वैयक्तिक नृत्य व सामूहिक नृत्य हे दोन प्रकार नवरत्न स्पर्धेला जोडावे (सांस्कृतिक मधील अन्य प्रकार नवरत्न स्पर्धामध्ये अंतर्भूत आहेतच त्यामुळे पुन्हा घ्यायची गरज नाही) अश्या सूचना संघटनेच्या वतीने हरीश ससनकर, राज्य सरचिटणीस, रवी सोयाम जिल्हा सरचिटणीस, निखिल तांबोळी जिल्हा कोषाध्यक्ष, मनोज बेले तालुका अध्यक्ष यांनी प्रशासनाला सादर केल्या.