चंद्रपूर जिल्यातील सिंचन आणि पाणी प्रश्न सुटणार;वर्धा नदीवर 3 बंधारे बांधण्यासाठी 1900 कोटींची तरतूद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ जानेवारी २०२०

चंद्रपूर जिल्यातील सिंचन आणि पाणी प्रश्न सुटणार;वर्धा नदीवर 3 बंधारे बांधण्यासाठी 1900 कोटींची तरतूद

विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीत उपमुख्यमंत्री पवारांच्या सूचना
खासदार धानोरकरांच्या प्रयत्नांना यश
चंद्रपूर/प्रतिनिधी: 
वर्धा नदीवर घुग्घूस, भद्रावती आणि राजुराजवळ बंधारे बांधण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात सुमारे 1900 कोटी रुपयांची तरतूद करण्याची सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी विभागीय आढावा बैठकीत केली. 

नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी आयोजित बैठकीला उपमुख्यमंत्री अजीत पवार, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, प्रतिभा धानोरकर तसेच जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. घुग्घूसजवळील प्रस्तावित बंधाऱ्यामुळे चंद्रपूर शहराचा भविष्यात पाणीप्रश्न सुटणार आहे.

वर्धा नदीचे पावसाचे पाणी वाहून जाते. त्याचा योग्य वापर करता यावा म्हणून या नदीवर बंधारे बांधण्यात यावे, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडे केली. पश्चिम महाराष्ट्र, विशेषत: बारामती परिसरात चेन बंधारे बांधण्यात आले आहे.

 याच धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीवर बंधारे बांधण्यात यावे. त्यामुळे सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी मागणी धानोरकरांनी लावून धरली. 

उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी धानोरकरांच्या या मागणीची दखल घेत घुग्घूस, भद्रावती आणि राजुराजवळ वर्धा नदीवर बंधारे बांधण्यासाठी सुमारे 1900 कोटी रुपयांची तरतूद आगामी अर्थसंकल्पात करण्यात येईल, निधी टप्यात वितरीत करण्यात येईल असे आश्वासन बैठकीत दिले. तसेच अधिकाऱ्यांना तशी सूचनाही केली.