'भारत बचाओ महारॅली' मध्ये विदर्भातून ५ हजार शेतकरी सहभागी होणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ डिसेंबर २०१९

'भारत बचाओ महारॅली' मध्ये विदर्भातून ५ हजार शेतकरी सहभागी होणार


महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांची माहिती नागपूर : सर्व बाजूंनी संकटात असलेला शेतकरी, वाढती बेरोजगारी व आर्थिक मंदी याकडे केंद्रातील भाजप सरकारचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे येत्या १४ डिसेंबर रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानात भारत बचाव महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष मा.सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात किसान काँग्रेसच्या नेतृत्वात विदर्भातून सुमारे ५ हजार तर देशभरातून १ लाख शेतकरी, शेतमजूर सहभागी होणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे विदर्भ विभाग प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

            केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून शेतकरी, शेतमजूर , सुशिक्षित बेरोजगार व सर्वसामान्यांचे जगणे अतिशय कठीण झाले आहे. भाजप सरकारचे प्रत्येक धोरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. देशभरात शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःला संपविण्याचा एकही मार्ग सोडला नाही एवढी वाईट अवस्था या सरकारने केली आहे. त्यामुळे याविरोधात शेतकऱ्यांची एकजूट दाखविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे असे देवानंद पवार म्हणाले.

            गेल्या काही वर्षात सातत्याने शेतकरी कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटांमुळे प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पाहात नाही. नोटबंदी व जीएसटी चा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. त्या धक्क्यातून शेतकरी अजूनही बाहेर निघालेला नाही. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारने नोकऱ्या तर दिल्याचं नाही  मात्र त्यांच्या मनमानी धोरणामुळे कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले. अनेक कंपन्या व व्यवसाय बंद पडले  व महिलांवरील अत्याचारांमध्ये देखील प्रचंड वाढ झाली. भाजपच्या  हिटलरशाही नितीमुळेच संपूर्ण देश संकटात सापडला आहे,म्हणून आता देश वाचवण्याची वेळ आल्याने राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे 'भारत बचाओ आंदोलन' होत असे पवार म्हणाले.
              या आंदोलनाची देशभर जोरदार तयारी केल्या जात असून दिल्ली येथील अ.भा.काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये दि १६ नोव्हें.ला आंदोलनच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली. लाखो शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार युवक किसान काँग्रेसच्या नेतृत्वात स्वयंस्फूर्तीने या आंदोलनात सहभागी होणार आहेत. जनतेची एकजूट दाखवून भाजपच्या सत्तेचा माज उतरविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज देवानंद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.