विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे विधानभवनावर १८ रोजी हल्लाबोल आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ डिसेंबर २०१९

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे विधानभवनावर १८ रोजी हल्लाबोल आंदोलन
नागपूर - सेवेत कार्यरत शिक्षकांना टिईटीतून मुक्त करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे बुधवारी (ता १८) शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
सत्तांतरण झाल्यानंतर प्रथमच नवीन सरकारला शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यावरुन विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर घेरणार आहे. २०१३ पासून कार्यरत शिक्षकांना टिईटी सक्तीचे करुन त्यांच्या नोक-या हिसकावून घेतले जात आहे. या अन्याया विरोधात रणशिंग फुंकत कार्यरत शिक्षकांना टिईटीतून मुक्त करावे, नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या न्यायालयीन कर्मचा-यांप्रमाणे २००५ पासून सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांना प्रती विद्यार्थी अनुदान देण्याबाबत गठीत करण्यात आलेला अभ्यासगट तात्काळ रद्द करावा,  प्रचलित नियमानुसार शाळांना 100% अनुदान द्यावे, शिक्षकांना तात्काळ आश्वासित प्रगती योजना (10,20,30) लागू करावी, विना अनुदानित व अंशतः अनुदानित संस्थेतील कर्मचाऱ्यांना TET ची अट रद्द करावी, संच मान्यतेत झालेल्या चुका तात्काळ दुरूस्त करण्यात याव्यात, वरिष्ठ व निवड श्रेणी साठी आवश्यक असलेली प्रशिक्षणाची अट तात्काळ रद्द करावी, शिक्षणाधिकारी व वेतन पथक कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरावी, कायम विना अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालय अनुदानित आणण्याकरीता निकषांची अट शिथिल करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पद भरती तात्काळ सुरू करावी, या मागण्यांचा समावेश आहे. 
हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांच्या नेतृत्वाखाली चाचा नेहरू बालोद्यान, शुक्रवारी तलाव नागपूर येथून सकाळी ११ वाजता होणार आहे. 

शिक्षकांनी आपला स्वाभिमान जागृत ठेवून या हल्लाबोल आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, नागपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खंडाईत, ग्रामिण जिल्हा संघटक गणेश खोब्रागडे, शहर संघटक रविकांत गेडाम, शहर संघटक समीर काळे, विभागीय अध्यक्ष महेश गिरी, महिला जिल्हा संघटक प्रणाली रंगारी, अल्पसंख्याक संघटक मोहम्मद जाफर, गौरव दातीर, अमोल राठोड,  दिपक कोंबाडे,  मेघा ढोरे यांनी केले आहे