भैय्याजी घोडाम यांच्या डोळ्यांनी जग पाहतील दोन दृष्टीहीन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ डिसेंबर २०१९

भैय्याजी घोडाम यांच्या डोळ्यांनी जग पाहतील दोन दृष्टीहीन


चंद्रपूर- रयतवारी कोलरी परिसरातील आमटे-ले आऊट निवासी भैय्याजी घोडाम यांचे आज 5 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता अकस्मात निधन झाले.भैय्याजी घोडाम वेकोलिच्या महाकाली काॅलरीमध्ये मेट पदावरून 12 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते.महाकाली काॅलरी युनिटच्या सिटू युनियन व एसीएसटी कौन्सिलचे अध्यक्षपद सुध्दा त्यांनी भूषविले.साहजिकच सामाजिक विचारांचा त्यांच्या संपूर्ण परिवारावर प्रभाव होता. 72 वर्ष वय असलेले भैय्याजी सकाळी पाच उठून दिनचर्या सुरू करायचे. परंतु आज सकाळी सहा वाजेपर्यंत ते झोपेतून उठले नाही आणि घरच्यांना त्यांना शंका आली. म्हणून त्यांच्या पत्नी प्रभा यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. हालचाल करत नसल्याचे लक्षात आल्यामुळे घरच्यांनी त्यांना तातडीने डॉक्टर आईंचवार यांच्या सिएचएल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर त्यांची प्राणज्योत मावळल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिवारातील लोकांना धक्का बसला.डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर त्यांचा मृतदेह घरी नेण्यात आला. त्यांच्यामागे पत्नी प्रभा, मुलगा सुजित आणि प्रजय व मुलगी रेखा तसेच सुना, जावई व नातू असा मोठा परिवार आहे. अवघे घोडाम कुटुंब दुःखात असतानाही परिवारातील सदस्यांची सामाजिक भावना स्वस्थ बसू देत नव्हती त्यामुळे मुलांनी वडिलांचे नेत्रदान करण्याचे ठरवैले. दिवंगत भैय्याजी घोडाम यांचे जावई नंदकिशोर सोनारकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जनविकास सेनेचे कार्यकर्ते आहेत. सकाळी दहा वाजता नेत्रदान करण्याचे परिवाराकडून ठरविण्यात आल्यानंतर जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख,निलेश पाझारे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी प्रदीप अडकिने व अनिल दहागावकर यांच्याशी संपर्क साधला. या सर्वांनी सामान्य रुग्णालयातील नेत्रदान विभागाचे नेत्रदान समुपदेशक योगेंद्र इंदुरकर यांना नेत्रदानाबद्दल कळविले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र चिकित्सा अधिकारी सुधाकर पेंडसे,विवेक मसराम आणि नेत्रदान समुपदेशक योगेंद्र इंदुरकर यांनी तातडीने नेत्रदानाची प्रक्रिया करण्यासाठी घोडाम यांच्याकडे रवाना झाली. सकाळी अकरा चे सुमारास नेत्रदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे 72 वर्ष वय असतानाही भैय्याजी घोडाम यांना साधा चष्मासुद्धा लागला नव्हता. रोज सकाळची दिनचर्या झाल्यानंतर वर्तमानपत्र वाचण्याची त्यांना सवय होती. चष्म्याशिवाय वर्तमानपत्रातील बारीक अक्षर सुद्धा ते वाचत होते. त्यांचे नेत्र अतिशय सुदृढ होते.आता या दोन नेत्रांनी जगातील दोन दृष्टीहिनाना जग पाहायला मिळणार आहे. य घोडा यांचे नेत्र तातडीने सेवाग्राम च्या नेत्रपेढी मध्ये पोहोचविण्याचे काम सामान्य रुग्णालयातील चमूने केले.