मधाच्या पोळीजवळ जमा होऊ लागल्या मधमाशा! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० डिसेंबर २०१९

मधाच्या पोळीजवळ जमा होऊ लागल्या मधमाशा!कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेतील भुजबळ कार्यालय गर्दीने झाले हाउसफुल

येवला प्रतिनिधि / विजय खैरनार
छगन भुजबळ मंत्री असताना संपर्क कार्यालयात गर्दी ओसंडून वाहत होती मात्र २०१४ मध्ये सत्ता गेली अन त्यानंतर काही दिवसातच भुजबळ अडचणीत आले त्यावेळी त्यांच्या येवला येथील संपर्क कार्यालयात कार्यकर्ते शोधण्याची वेळ येत होती भुजबळ अडचणीत आले तसे संपर्क कार्यालयही ओस पडले होते मात्र आता पुन्हा भुजबळ हेवीवेट मंत्री झाल्याने काल त्यांच्या भोवती मतदारसंघात कार्यकर्त्यांची गर्दी हाऊसफुल्ल असल्याचे चित्र दिसले. मधाच्या पोळ्यात मध असले की मधमाशा जशा आपोआप जमा होतातच असाच  काहीसा प्रत्यय संपर्क कार्यालयात दिसून आला.
२००४ मध्ये भुजबळ यांच्या रूपाने येवलेकरांनी प्रथमच लाल दिवा पाहिला आणि पुढील दहा वर्षे तो अनुभवलाही त्या काळात भुजबळ सार्वजनिक मंत्री असल्याने मतदारसंघात प्रचंड कामे सुरू असल्याने येवल्यात ठेकेदारांचा धुमाकूळ झाला होता.ज्याला ठेकेदार शब्द लिहिता येत नव्हता असे लोकही ठेकेदारी करून करून पैसे कमवत होते. परिणामी चलती का नाम गाडी या म्हणीप्रमाणे भुजबळांच्या अवतीभवती सदैव गराडा असायचा अन त्यात ठेकेदारांची गर्दीचा महापूर असायचा. भुजबळ येवला येथे मुक्कामी असले की संपर्क कार्यालय तर नेहमीच गर्दीने गजबजून जायचे.मात्र २०१४ ला सत्ता गेल्याने मंत्रिपद गेले आणि २०१५ ला भुजबळ तुरुंगातही गेले. त्यानंतर मात्र कार्यकर्ते शोधण्याची वेळ भुजबळांच्या यंत्रणेवर आली होती अर्थात अनेक प्रामाणिक लोक या काळातही बरोबर राहिले परंतु काही संधीसाधू कार्यकर्ते मात्र दुरावले होते.कार्यकर्त्यांची उणीव नक्कीच भुजबळांना जाणवत होती परंतु आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत वावरतांना भुजबळ दिसताहेत. पक्षप्रमुख शरद पवार यांनीही त्यांना पहिल्या फळीत शपथ देऊन ते महत्त्वाचे खाते सांभाळतील याचे संकेत दिले असल्याने आता आपला आमदार चांगल्या पदावर जाणार याची सर्वांनाच जाणीव झाली आहे. त्यामुळे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच येवल्यात आल्यावर त्यांच्या स्वागतासाठी आणि भेटीसाठी कार्यकर्त्यांचे मोहोळ जमा झालेले दिसले.यात अनेक चेहरे असे होते जे २०१४ नंतर २०१९ मध्येच दिसले भुजबळ येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत कार्यालय गर्दीने फुल होते..हे चित्र पाहिल्यावर असतील शिते तर जमतील भुते या म्हणीची सर्वांना आठवण झाली आणि चेहऱ्यावर हास्य चमकले.भुजबळ काल सायंकाळी येवल्यात दाखल झाले.तत्पूर्वी विंचूर,देशमाने सह विविध ठिकाणी त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.कार्यकर्ते पदाधिकारी व हितचिंतकांनी फटाक्यांची आतषबाजी करत वाजत गाजत जल्लोषात स्वागत केले.विविध ठिकाणी भुजबळ यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले.येथे शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे,डॉ. सुधीर जाधव यांनी भुजबळांची भेट घेऊन सत्कार केला.ज्येष्ठ नेते अंबादास बनकर,माजी नगराध्यक्ष पंकज पारख,राधाकिसन सोनवणे,अरुण थोरात,विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर,पंचायत समिती सदस्य मोहन शेलार,मकरंद सोनवणे,सचिन कळमकर,प्रकाश वाघ,गणपत कांदळकर, नावनाथ काळे, साहेबराव आहेर,दीपक लोणारी,संतोष खैरणार,सुनील पैठणकर,भाऊसाहेब धनवटे,सचिन सोनवणे,शिवसेनेचे राजेंद्र लोणारी,धीरज परदेशी आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.