शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजनेचा लाभ द्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ डिसेंबर २०१९

शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजनेचा लाभ द्या🎯 विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाची मागणी
🎯 शिक्षणमंत्री थोरात यांचा सकारात्मक प्रतिसाद 

नागपूर, दि. 22 : राज्यातील मान्यताप्राप्त व अनुदानित खाजगी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याची मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांची अधिवेशन काळात भेट घेतली. यात २००५ नंतर कार्यरत कर्मचारीवर्गाला जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करावी, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रचलित पध्दतीने अनुदान टप्पा देण्यात यावा, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी, २०१९ पर्यंत कार्यरत शिक्षकांना टिईटीतून मुक्त करीत सवलत द्यावी या मागण्यांचा समावेश होता. या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच संबंधित विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिष्टमंडळाला दिले. त्या अनुषंगाने शिक्षक कर्मचारीवर्गाला कॅशलेस आरोग्य योजना लवकरच लागू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री श्री.बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत दिली. यात  आरोग्य विभागामार्फत मान्यता दिलेल्या 27 आकस्मिक व 5 गंभीर आजारावरील उपचारार्थ आंतरुग्ण कालावधी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती  कॅशलेस स्वरुपात करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे शिक्षणमंत्री थोरात यांनी सांगितले. तसेच ‪राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी पूर्वीचे प्रचलित अनुदान धोरण अंमलात आणणार असल्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. शिष्टमंडळात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे शिलेदार खिमेश बढिये, गणेश खोब्रागडे, रविकांत गेडाम, समीर काळे, महेश गिरी, राजू हारगुडे, रंगराव पाटील, कमलेश सहारे, प्रकाश भोयर, संजय धरममाळी, सौ पुष्पा बढिये, सौ प्रणाली रंगारी, मेघा ढोरे, भिमराव शिंदेमेश्राम यांच्यासह विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.