पैसे घेऊन मतदानाची प्रवृत्ती धोकादायक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ नोव्हेंबर २०१९

पैसे घेऊन मतदानाची प्रवृत्ती धोकादायक
अॅड . पारोमिता गोस्वामी यांचे कुल्ली स्मृती समारोहात प्रतिपादन

बुलडाणा /प्रतिनिधी 
आदिवासी , दलित , गोरगरीब जनतेला सामाजिक कार्यकर्ते आपापल्या समस्या सोडवून घेण्यासाठी हवे असतात . पण , या सामाजिक कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये मत मिळत नाहीत . कारण पैसे देणाऱ्यांनाच मत देण्याची प्रवृत्ती वाढत आहे . ही लोकशाहीसमोरील सर्वांत मोठी समस्या आहे , असे विचार सामाजिक कार्यकर्त्या अॅड . पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केले . 
बुलडाणा शहरात प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या परिसरात अरुणा कुल्ली आणि सुजाता कुल्ली यांच्या ज्ञानदान प्रकल्पांतर्गत प्रा . डॉ . स . त्र्यं . कुल्ली स्मृती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे . २३ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या नऊ दिवसीय स्मृती समारोहाचे उद्घाटन अॅड . पारोमिता गोस्वामी यांच्या हस्ते झाले . 
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी अॅड वृषाली बोंद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रगती वाचनालयाचे संचालक अरुणा कुल्ली साहित्यिक नरेंद्र लांजेवार , मुकुंद पारवे , पु . दा . गणगे , विनोद देशमुख , रविकिरण टाकळकर , शोभा पवार , सुजाता कुल्ली , विजया काकडे , मणालिनी सपकाळ यांची उपस्थिती होती .

आम आदमी पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविल्यानंतर त्यांना अपयश का आले , याची राजकीय कारणमीमांसा त्यांनी केली . आज राजकारणामध्ये दिसते मोठ्या प्रमाणावर विक्षिप्तपणा आलेला आहे . लोकशाहीमध्ये निवडून आलेली व्यक्ती ही राजेशाहीच्या थाटात वावरताना दिसते . निवडून येण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो व तो पैसा पुन्हा सामान्य जनतेकडूनच वसूल केला जातो .

सांस्कृतिक जागृती सोबतच आता राजकीय जाणिवांची सुद्धा समाजात जागृती घडवून आणणे गरजेचे आहे . त्यासाठी साहित्यातून राजकीय शिक्षण देण्याची आज नितांत आवश्यकता आहे , असे विचारही पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केले . स्वतःचा निवडणूक अनुभव सांगताना आदिवासी , दलित, गोरगरीब जनतेला सामाजिक कार्यकर्ते आपापल्या समस्या सोडवण्यासाठी हवे आहेत. फण, राजकारणात सहकार्य करीत नाहीत. बलाढ्य नेत्यांच्या पैशाला भुलून मतदान केले जात आहे ही परिस्थिती आता बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. 

या कार्यक्रमाला बुलडाणा परिसरातील बहुसंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते . ज्ञानदान अंतर्गत सलग २३ नोव्हेंबर या दिवसांमध्ये विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे . या कार्यक्रमाचा लाभ रसिकांनी घ्यावा , असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .