मेट्रोने प्रवास करणे विमान प्रवासासारखे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ नोव्हेंबर २०१९

मेट्रोने प्रवास करणे विमान प्रवासासारखे

गडचिरोलीच्या आदिवासींचा पहिलाच मेट्रो प्रवास नागपूर ०९ : तशी नागपूर मेट्रोला लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसाची ही तिसरी भेट. गडचिरोली या अतिदुर्गम भागातील आदिवासींना शहर पाहणे देखील स्वप्नवत वाटावे इतके ते मूळ प्रवाहापासून दूर राहतात. अश्या भामरागड भागातील कोडपे आणि तिरकामेटा या दोन अतिदुर्गम भागातील ३५ आदिवासी महिला व पुरुषांनी पहिल्यांदाच शहर पाहिले तसेच आयुष्यात रेल्वेनेही प्रवास न करणाऱ्या या बांधवांनी नागपूर मेट्रोचा प्रवास अनुभवला. मेट्रोने प्रवास करणे विमान प्रवासासारखे असल्याचे यावेळी त्यांनी व्यक्त केले.  

लोकबिरादरी प्रकल्पाच्या सदस्यांच्या पुढाकार आणि प्रयत्नांनी आदिवासी बांधवाचा हा शहरी दौरा होता. गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील रहिवासी असलेल्या आदिवासी बांधवानी गुरुवार, ७ नोव्हेंबर रोजी  नागपूरच्या माझी मेट्रोला भेट दिली. हे सर्व आदिवासी बांधव गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाशी जुळलेले आहेत. हेमलकसा, कोडपे आणि तिरकामेटा अश्या विविध गावातील एकूण ३५  बंधू-भगिनी या दौऱ्यात सहभागी झाले होते. आधुनिक विकास, तंत्रज्ञान, कामाचे स्वरूप या बांधवाना माहिती व्हावे या उद्देशाने हा दौरा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी त्यांनी साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपासून सुरुवात करत सीताबर्डी तसेच पुन्हा परतीचा प्रवास केला. स्थानकांवरील आंतरिक सज्जा, सरकता जिना, स्टेशन इमारतीचे स्थापत्य, मेट्रोच्या आतली व्यवस्था हे सगळे पाहून ते अचंभित झाले होते. मात्र हे सगळं समजून शिकून घेण्याच्या जिज्ञासेमुळेच सरकत्या जिन्यावरून चढण्याचे कसाब त्यांनी क्षणात शिकून घेतले. प्रवासादरम्यान गाडीतले वातानुकूलित वातावरण, बैठक व्यवस्था, मोठी खिडकी, खिडकीमधून पाहतांना उन्नती मार्गावरून दिसणाऱ्या धावत्या गाड्या, मधल्या भागात दिसणारी वनराई, उंच इमारती, शहराचे धावते झगमगते लोभसवाणे रूप बघून तसेच एअरपोर्ट परिसरातून मेट्रो धावतांना त्यांना उडते विमानही पाहावयास मिळाले ते पाहतांना हे बांधव लहान मुलांसारखे हरखून गेले होते.  

आदिवासी बांधवांची माडिया आणि गोंडी ही मुख्य भाषा असली तरी देखील त्यांनी मराठी भाषेत मेट्रो अधिकाऱ्यांशी संवाद साधला. शहरात होऊ घातलेल्या मेट्रो प्रकल्पाचे आणि इतर आधुनिक विकास कार्य पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याचे मत आदिवासी बांधवानी व्यक्त केले. जंगलांपलीकडचं आधुनिक जग पाहायला मिळत असल्याने फार आनंद होत असल्याचे मत त्यांच्या मार्गदर्शकांनी मांडले. वातानुकूलित स्वच्छ सुंदर मेट्रो पाहून आनंद होत असून भविष्यात मेट्रोत पुन्हा पुन्हा प्रवास करण्याची तीव्र इच्छा यांनी जाहीर केली.