अग्निशमन विभागाच्या नोटीसकडे दुर्लक्ष करणा-यांवर फौजदारी कारवाई करा! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ नोव्हेंबर २०१९

अग्निशमन विभागाच्या नोटीसकडे दुर्लक्ष करणा-यांवर फौजदारी कारवाई करा!
अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती ॲड.संजय बालपांडे यांचे निर्देश

 

नागपूरता. १५ : शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मोठ्या इमारती, सदनीका, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठान आदी ठिकाणी अग्निशमन सुविधा असणे आवश्यक आहे. अशा ठिकाणची पाहणी करुन ज्या ठिकाणी अग्निशमन सुरक्षा व्यवस्था नाही अशा इमारती व आदींना मनपाच्या अग्निशमन विभागाद्वारे वेळोवेळी नोटीस देण्यात येते. मात्र अनेकदा नोटीस देउनही त्यावर इमारत मालकांकडून कोणतिही कार्यवाही केली जात नाही. याची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र आग प्रतिबंधन जीव संरक्षण उपाय योजना अधिनियम २००६ नुसार मनपाच्या अग्निशमन विभागाच्या नोटीसकडे दुर्लक्ष करणा-यांवर फौजदार कारवाई करण्याचे निर्देश अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती ॲड.संजय बालपांडे यांनी दिले.

 

शुक्रवारी (ता.१५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये अग्निशमन व विद्युत विशेष समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत सभापती ॲड.संजय बालपांडे यांच्यासह उपसभापती निशांत गांधी, सदस्य भारती बुंडे, लकडगंज झोन सभापती राजकुमार साहु, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, हनुमाननगर झोन सभापती माधुरी ठाकरे, आसीनगर झोन सभापती विरंका भिवगडे, धंतोली झोन सभापती लता काडगाये, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, कार्यकारी अभियंता ए.एस.मानकर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्‍हाण, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, उपअभियंता कल्पना मेश्राम यांच्यासह अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

बैठकीत महाराष्ट्र आग प्रतिबंधन जीव संरक्षण उपाय योजना अधिनियम २००६ नुसार केलेल्या कार्यवाहीबाबत चर्चा, शहर विकास आराखड्यात अग्निशमन स्थानाकरिता आरक्षित झिंगाबाई टाकळी, अंबाझरी, चिंचभवन, परसोडी व सोमलवाडा या जागा ताब्यात घेणे, अग्निशमन विभागातील जुने स्थानक लकडगंज, गंजीपेठ व न्यू कॉटन मार्केट पाचपावली विभागातील जुने स्थानक पुनर्बांधकाम करणे, राठोड लेआउट येथील अग्निशमन स्थानकाकरिता असलेली जागा ताब्यात घेणे, वाठोडा अग्निशमन स्थानकाचे बांधकाम करणे, पथदिव्यांच्या दुरूस्ती व सुस्थितीकरिता नियुक्त एजन्सीची कामगिरी व सर्व प्रभाग अंतर्गत बंद असलेल्या विद्युत दिव्यांबाबत चर्चा करण्यात आली.

 

महाराष्ट्र आग प्रतिबंधन जीव संरक्षण उपाय योजना अधिनियम २००६ नुसार अग्निशमन नियमांचे पालन न करणा-यांवर कारवाईची तरतुद आहे. या कायद्यान्वये अग्निशमन विभागाकडून ज्यांना नोटीस देण्यात आले आहे. अशांनी १५ दिवसाच्या आत नोटीसची पूर्तता करुन अग्निशमन सुरक्षा व्यवस्था करावी अन्यथा मनपातर्फे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश सभापती ॲड.संजय बालपांडे यांनी दिले. अग्निशमन स्थानकाकरिता आरक्षित जागांच्या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करून त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. मनपा अग्निशमन विभागाचा उद्देश संबंधितांवर कारवाई करण्याचा नसून जिवीत व वित्त हानी टाळणे हा असून जर संबंधित प्रतिष्ठान किंवा व्यक्ती आवश्यक उपाययोजना करीत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे, या मागील हेतू आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 

विद्युत दिव्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

यावेळी अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती ॲड.संजय बालपांडे यांनी झोननिहाय पथदिव्यांची दुरूस्ती व सुस्थितीसाठी नियुक्त एजन्सीच्या कामगिरीचा आढावा घेतला. झोनमध्ये अनेक ठिकाणी पथदिवे बंद असून बरेच दिवस ते दुरूस्त केले जात नसल्याची तक्रार यावेळी झोन सभापतींमार्फत करण्यात आली. या तक्रारीवर गांभीर्याने दखल घेत तातडीने झोन सभापतींच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश सभापती ॲड.संजय बालपांडे यांनी दिले.

 

तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था करा

पथदिवे बंद असल्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येतात. या तक्रारींवर प्रशासनाकडून योग्य कार्यवाही होणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांची सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टीने तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था करण्याचे निर्देशही यावेळी ॲड.संजय बालपांडे यांनी दिले.