श्रीरामजन्मभूमीविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भाजपाकङून स्वागत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ नोव्हेंबर २०१९

श्रीरामजन्मभूमीविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भाजपाकङून स्वागतमा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया


प्रभूश्रीरामचंद्रांच्या आदर्शांचा स्वीकार करीत, हा निकालाचा सर्वांनी स्वीकार करावा. यातूनच ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’च्या दिशेने भक्कम वाटचाल होणार आहे. देशातील एक मोठा विवाद आता यामुळे संपला आहे.


 श्रीरामजन्मभूमीविषयी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत करत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत सांगितले. 

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आणि सहमुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “श्रीरामजन्मभूमी संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च मूल्यांना अधिक मजबूत करणारा आहे. हा आदेश म्हणजे कोणाचा विजय किंवा कोणाचा पराजय नाही. भारतीय अस्मितेचे जे प्रतिक आहे, त्या संदर्भातील भारतीय आस्था मजबूत करणारा हा निर्णय आहे. याच्याकडे पाहत असताना कोणत्याही वेगळ्या चष्म्यातून पाहण्याची आवश्यकता नाही. जवळजवळ सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयानंतर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगले वातावरण आपल्याला पहायला मिळत आहे. कोणताही अभिनिवेश न आणता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करण्यात येत आहे, याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. मला विश्वास आहे की, महाराष्ट्रामध्ये जी परंपरा आहे, त्या परंपरेचे पालन करत सर्व लोक शांतता प्रस्थापित ठेवतील. विविध समाजाचे आणि धर्मांचे काही सण आगामी काळात आहेत. हे सण शांततेत आणि उत्साहात सर्व लोक साजरे करतील. मला असे वाटते की,  मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी भारतभक्तीची भावना व्यक्त केली आहे, तोच भाव या निर्णयानंतर निश्चितपणे भारतात तयार झाला आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’, या तत्वानुसार नवीन भारताकरता सर्व लोक एकजुटीने निर्णयाचा सन्मान करतील, हा विश्वास व्यक्त करतो आणि या निर्णयाचे अतिशय मनःपूर्वक स्वागत करतो.”