चंद्रपूर:आणखी एका जखमी वाघाचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ नोव्हेंबर २०१९

चंद्रपूर:आणखी एका जखमी वाघाचा मृत्यू

चंद्रपूर:ललित लांजेवार
चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मांजरी गावाजळील नदीपात्रात वाघाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच २० दिवस उलटत नाही तोच परत चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यचांदा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या धाबा वनपरिक्षेत्रातील लाठी नियत क्षेत्राचे ५५९ मध्ये वयस्क वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली.

मंगळवारी दुपारी ४ वाजेपासून तर ७ वाजेपर्यंत हा वाघ या नाल्याच्या पात्रात जखमी व सुस्त अवस्थेत आढळून आला होता, यानंतर वनविभागाचे दोन कर्मचारी घटना स्थळावर हजर झाले होते. मात्र दुपारी ४ वाजेपासून तर ७ वाजेपर्यंत वनविभागाचा कोणताही मोठा अधिकारी त्याठिकाणी फिरकला नसल्याची माहिती हाती आहे.

 मिळालेल्या माहिती माहितीवरुन प्राथमिक अंदाजात या वाघाची लढाई दुसऱ्या वाघासोबत किंवा दुसऱ्या हिंसक प्राण्यासोबत झाली असावी कारण या वाघाच्या मानेवर व पाठीवर जखम असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. या सोबतच जखमी वाघ असल्याने त्याला शिकार करणे शक्य झाले नाही व तो अशक्त होत मेला असल्याचे देखील अंदाज वर्तवला जात आहे.

विशेष म्हणजे सिमावर्ती असलेल्या या परिसरात दोन महिन्याभरापूर्वी पोडसा गावालगतच्या शेतशिवारात वाघिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे प्रकरण घडले.सदर मृत्यूचे कारण अद्यापही समोर आले नसतांना हि दुसरी घटना घडली आहे.

सध्या या वाघाचा शवविच्छेदन करण्यासाठी चंद्रपूर येथे नेण्यात आले आहे,या नंतरच वाघाचा नेमका मृत्यू कशाने झाला याचे कारण स्पष्ट होणार आहे.

 वाघांचा जिल्ह्या म्हणून जगभर प्रसिद्ध असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या एका पाठोपाठ एक होणाऱ्या मृत्यूने वन्यजीव प्रेमी चिंतेत पडले आहे.