१३६ पिशव्या रक्तदान करून कोराडी वीज केंद्राने जोपासली सामाजिक बांधिलकी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० ऑक्टोबर २०१९

१३६ पिशव्या रक्तदान करून कोराडी वीज केंद्राने जोपासली सामाजिक बांधिलकी

नागपूर/प्रतिनिधी:
समाजाप्रती आपले काही देणे लागते, या जाणीवेतून कोराडी वीज केंद्रातर्फे नियमित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच विद्युत विहार वसाहत दवाखाना येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले व दिवसभरात तब्बल १३६ पिशव्या रक्तदान करून यापूर्वीचा १०४ पिशव्या रक्तदानाचा रेकॉर्ड मोडून नवा उच्चांक प्रस्थापित करण्यात आला. 

रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य अभियंता राजेश पाटील, उप मुख्य अभियंते गिरीश कुमरवार, सुनील सोनपेठकर, हेडगेवार रक्तपेढीचे डॉ.अनसिंगकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मुकेश गजभिये, वर्धापन दिन सचिव गजानन सुपे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्य अभियंता राजेश पाटील म्हणाले की, एका व्यक्तीच्या रक्तदानाने तीन रुग्णांचे प्राण वाचतात, त्यामुळे रक्तदान हे “महादान” आहे. कोराडी औष्णिक विद्युत केंद्राशी निगडीत जास्तीत जास्त व्यक्तींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे मत त्यांनी व्यक्त केले तर डॉ.हेडगेवार रक्तपेढीचे डॉ.अनसिंगकर यांनी रक्तदानाचे फायदे, शरीरातील लोहप्रमाण संतुलन याविषयी मार्गदर्शन केले. रक्त संकलनाचे काम डॉ.हेडगेवार रक्तपेढीच्या तज्ज्ञ वैद्यकीय चमूने केले व त्यास कोराडी वीज केंद्र दवाखाना चमूचे मोलाचे सहकार्य लाभले. 

महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचारी, कुटुंबिय, संघटना प्रतींनिधी, प्रशिक्षणार्थी, कंत्राटदार, कंत्राटी कामगार यांनी रक्तदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे महिला प्रतींनिधींनी रक्तदानात हिरीरीने सहभाग घेतला त्यामध्ये प्रणोती झाडे, रीना पांडे, शकुंतला धुर्वे, पल्लवी मानवटकर आणि स्वाती काळे यांचा समावेश आहे.

शिबिराला मुख्य अभियंते राजकुमार तासकर, दिलीप धकाते, अधीक्षक अभियंते विराज चौधरी, विलास मोटघरे, नारायण राठोड,कन्हैयलाल माटे, डॉ.भूषण शिंदे, उप महाव्यवस्थापक(मानव संसाधन) डॉ.प्रकाश प्रभावत, कल्याण अधिकारी प्रसाद निकम प्रामुख्याने उपस्थित होते. 

उद्घाटन सत्राचे सूत्र संचालन मिलिंद रहाटगावकर यांनी तर उपस्थितांचे आभार डॉक्टर मुकेश गजभिये यांनी मानले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी रक्तदान शिबीर समितीतील सर्व पदाधिकार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यात गजानन सुपे, राजेश गोरले, विलास भालेराव, मुकुंद भोकरधनकर, लक्ष्मण बावनकुळे, प्रवीण बुटे तसेच दवाखाना चमूचा विशेषत्वाने समावेश होता.