किशोरभाऊ तुम्ही निवडणूक लढवत नसाल तर तुमच्यासोबत घालवलेले माझे 10 वर्ष परत करा:विशाल निंबाळकर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ ऑक्टोबर २०१९

किशोरभाऊ तुम्ही निवडणूक लढवत नसाल तर तुमच्यासोबत घालवलेले माझे 10 वर्ष परत करा:विशाल निंबाळकर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
कांग्रेसकडून भरलेला उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द केल्यानंतर किशोर जोरगेवार निवडणूक लढवणार की नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. याविषयी चंद्रपूरकररांसह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे, त्याचे पडसाद आज दिवसभर उमटले. हजारो नागरिक आणि कार्यकर्त्यांनी जोरगेवारांच्या घराचा घेराव करून आपण निवडणूक लढावी, अशी विनंती केली. 

यावेळी त्यांच्यासोबत मागील दहा वर्षांपासून खांद्याला खांदा लावून काम करणारे नगरसेवक विशाल निंबाळकर यांनी जोरगेवारांना तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेत असाल तर तुमच्यासोबत घालवलेले माझे दहा वर्ष मला परत द्या, असे भावनिक आवाहन केले.

भारतीय जनता पक्ष सोडल्यापासून निंबाळकर जोरगेवारांसोबत काम करत आहेत. त्यामुळे सत्ता सोडून येणारे निंबाळकर हे जोरगेवारांचे कट्टर समर्थक समजले जातात. जोरगेवारांनी निवडणूक लढायची की नाही हा निर्णय गुलदस्त्यात ठेवला असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांसह निंबाळकर व्यथित झाले आहे.

 आज कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने गर्दी करत जोरगेवारांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. यावेळी निंबाळकर यांनी जोरगेवार समक्ष तुम्ही उमेदवारी मागे घेत असाल तर माझे दहा वर्षे मला परत द्या, असे भावनिक आवाहन केले.

यावेळी जोरगेवार म्हणाले माझ्यासाठी कोणी दहा, कोणी दोन तर जनतेंनी दिलेला एक क्षणसुद्धा महत्वाचा असल्याने, हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. पण माझ्या विरोधात जे राजकीय षडयंत्र सुरू आहे, ही आच माझ्या कार्यकर्त्यांवर पोहचू नये, यापोटी मी माझा निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे. 

मला एक रात्र द्या, उद्या मी माझा निर्णय जनतेसमक्ष जाहीर करीन, अशी विनंती उपस्थित जनसमुदयासमोर केली. यानंतर जमलेला जनसमुदाय शांत झाला. किशोर जोरगेवर निवडणूक लढवणार की नाही यासाठी परत एक रात्र वाट पाहावी लागणार आहे.