थकबाकीदारांच्या विरोधात महावितरण आक्रमक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ सप्टेंबर २०१९

थकबाकीदारांच्या विरोधात महावितरण आक्रमक

 

महाल,गांधीबाग,सिव्हिल लाईन्स विभागात महावितरणची कारवाई
नागपूर/प्रतिनिधी:
मागील आठवड्यात फ्रेंचयासी विभागात कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर महावितरणने थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात व्यापक मोहीम हाती घेत येथील १५३ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला. तसेच या वीज ग्राहकांकडून सुमारे २० लाख रुपयांची वसुली केली. 

९ सप्टेंबर पासून महावितरणने महाल, गांधीबाग आणि सिव्हिल लाईन्स विभागातील वीज वितरणाची जवाबदारी स्वीकारल्यानंतर शाश्वत आणि दर्जेदार वीज पुरवठ्यासोबतच थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात १३ सप्टेंबरपासून जोरदार मोहीम हाती घेतली आहे.

गांधीबाग विभागात महावितरणकडून १,१६० थकबाकीदार वीज ग्राहकांची यादी तयार करण्यात आली आहे. या विभागात कार्यरत ३० जनमित्रांना प्रत्येकी ४० थकबाकीदार वीज ग्राहकांची यादी दिली आहे. यातील ७५० पेक्षा अधिक वीज ग्राहकांकडे महावितरणकडून संपर्क साधण्यात आला. वीज देयकाची रक्कम थकीत ठेवणाऱ्या ७३ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. या वीज ग्राहकांकडे १२ लाख रुपयांची थकबाकी होती. जुन्यासह नवीन अश्या ७९ थकबाकीदार वीज ग्राहकांनी ८ लाख रुपये थकबाकीचे भरल्यावर त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. सिव्हिल लाईन्स भागात देखील अशीच मोहीम राबविण्यात आली. या विभागात ३१२ थकबाकीदार वीज ग्राहकांची यादी तयार करून जनमित्रांना देण्यात आली. येथे वीज देयकाचे पैसे न देणाऱ्या ७४ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आल्यावर त्यांनी ७ लाख ५३ हजार रुपयांचा भरणा केला. महाल विभागातील वाठोडा,सूतगिरणी, सुभेदार ले आऊट, दिघोरी, शुक्रवारी,महाल, रामबाग, मानेवाडा भागातील ६२८ थकबाकीदार वीज ग्राहकांची यादी तयार करण्यात आली आहे.

दक्षता पथक सक्रिय
महाल,गांधीबाग आणि सिव्हिल लाईन्स येथील वीज वितरणाची जवाबदारी महावितरणने स्वीकारल्यावर वीज चोरी,वीज मीटरमध्ये छेडछाड करणे, आकडे टाकून वीज चोरी करणे आदी प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरणचे शहर मंडल कार्यालयाचे दक्षता पथक देखील सक्रिय झाले आहे. या दक्षता पथकास नागपूर शहरात वीज चोरी शोधून काढण्याची जवाबदारी दिली आहे. ज्या वीज ग्राहकाकडे वीज चोरी सापडेल अश्या वीज ग्राहकाच्या विरोधात वीज कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सोबतच ज्या भागात वीज चोरी होत असल्याची माहिती नागरिकांना असल्यास त्यांनी महावितरणच्या जवळच्या वीज कार्यालयास कळवावी. असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, सिव्हिल लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, गांधीबाग विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जिवतोडे, महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांनी ही मोहीम व्यापक केली आहे.