मेट्रो पिलरवरील कलाकृती ठरतंय आकर्षणाचे केंद्र - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ सप्टेंबर २०१९

मेट्रो पिलरवरील कलाकृती ठरतंय आकर्षणाचे केंद्र


नागपूर १६: वर्धा महा मार्गावरील छत्रपती चौकात मेट्रोच्या पिलरवर उभारण्यात आलेली कलाकृती या चौकातून चहुबाजूने प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकांना आकर्षित करीत आहे. अल्प कालावधीत मेट्रोने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आलेख या कलाकृतीच्या माध्यमातून दर्शविण्यात आला आहे. उभ्या भिंतीवर किंवा पिलरवर अश्या प्रकारची कलाकृती उभारण्याचा प्रयोग पहिल्यांदाच शहरात राबविण्यात आला असून याला नागरिकांतर्फे ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मेट्रोच्या पिलरवरील या कलाकृतीकडे पाहतांना यात एकूण १८ मनुष्य दोरीच्या साहाय्याने वरती चढतांना दिसत आहेत. हे चित्र दर्शविण्यासाठी मेट्रोच्या या पिलरवर लोखण्डी साहित्यांचा वापर करून दोरीसारखे दिसणारे जाळ तयार करण्यात आले. गेल्या अनेक दिवसाच्या अथक प्रयत्नातून शहरातील ४० प्रसिद्ध कलाकारांनी ही कलाकृती तयार केली आहे. पिलरच्या ४९५ चौरस फूट इतकया भागावर ही कलाकृती चारही बाजूने दिसेल अश्याप्रकारे लावण्यात आली आहे. एम एस शीटच्या साहायाने संपूर्ण कलाकृती तयार करण्यात आली आहे. ट्राफिक सिग्नल सुरु होण्यापर्यंत चौकावर थांबलेले वाहनचालक कौतुहलाने या कलाकृतीकडे पाहतांना दिसत आहेत.

महा मेट्रोने ५० महिन्याच्या अल्प कालावधीत २५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग नागपूरकरांसाठी तयार केला. सरासरी २ किमीचा मार्ग दर महिन्याला तयार होत आहे. तसेच २०१९मार्च महिन्यात नागरिकांसाठी खापरी ते सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान प्रवासी सेवा देखील सुरु करण्यात आली. यामुळे नागरिकांना सीताबर्डी इंटरचेंज ते एयरपोर्ट किंवा मिहानपर्यंत मेट्रोचा आरामदायी प्रवास करून आवाजही करणे सहज शक्य झाले. यासाठी मेट्रोचे सर्व अधिकारी/कर्मचारी व हजारो मजूर दिवस रात्र कार्य करीत आहेत. एकजुटीने काम करून निर्माणाधीन प्रकल्पाचे कार्य पूर्ण होत आहे, हे या कलाकृतीच्या माध्यमातून दर्शविण्यात येत आहे.