कृष्ठरुग्ण क्षयरुग्ण शोधमोहीम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ सप्टेंबर २०१९

कृष्ठरुग्ण क्षयरुग्ण शोधमोहीम

असंसर्गजन्य रोग प्रतिबंध अभियानअसंसर्गजन्य रोग प्रतिबंध अभियानाला नागरिकांनी सहकार्य करावे : राहुल कर्डिले


चंद्रपूर, दि. 16 सप्टेंबर: राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संयुक्त कृष्ठरुग्ण क्षयरुग्ण शोध मोहिम तसेच असंसर्गजन्य प्रतिबंध जागरूकता अभियान 13 ते 28 सप्टेंबर 2019 दरम्यान राबवण्यात येणार आहे. सदर अभियान पोलिओच्या धर्तीवर राबवण्यात येत असून याला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

अभियानादरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व निवडक कारपोरेशन क्षेत्रातील एकूण 4 लाख 22 हजार 655 कुटुंबापर्यंत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देणार आहेत. तसेच कुष्ठरोग निर्मूलनाकरीता सर्वेक्षण करणार आहे. निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित उपचार करण्यात येणार आहे. यामध्ये कृष्ठरोग आजारात त्वचेवर फिकट लालसर बधीर चट्टा, त्या ठिकाणी घाम न येणे, तेलकट चकाकणारी त्याच्या त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधिरपणा अथवा जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, हात पाय यामध्ये अशक्त अशक्तपणा जाणवणे हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातील चप्पल गळून पडणे इत्यादी लक्षणे आढळून येतात.

तसेच क्षयरोगांमध्ये दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकी वाटे रक्त येणे, मानेवरील गाठी, इत्यादी लक्षणे आढळून येतात. तरी क्षयरोगाचे निदानाकरिता रुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधोपचार देण्यात येणार आहे.

असंसर्गजन्य आजारात आपले वजन वाजवीपेक्षा जास्त आहे. दारु अथवा तंबाखूचे नेहमी सेवन, कुटुंबामध्ये कोणालाही मधुमेह आणि उच्च रक्तदाब, स्तनांचा कर्करोग, स्तनामध्ये गाठ, निप्पल मध्ये पु किंवा रक्तस्राव किंवा स्तनाच्या आकारात बदल, गर्भाशय मुख कर्करोग, अंगावरून पांढरे रंगाचा स्राव व दुर्गंधी, मासिक पाळी व्यतिरिक्त योनीमधून रक्तस्त्राव, मासिक पाळी चक्रबंद झाल्यानंतर रक्तस्राव व शारीरिक संबंधांनंतर रक्तस्राव तसेच तोंडाचे कर्करोग दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी तोंड येणे, तोंडामध्ये लाल किंवा पांढरा चट्टा असणे. तोंडामध्ये गाठ किंवा जखम किंवा तोंड उघडताना त्रास होणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. असंसर्गजन्य रोगाबद्दल समाजातील वय वर्ष 30 वा अधिक वयोगटातील लोकांची तपासणी करून उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोग, मुख, गर्भाशय व स्तन रोगांबाबत नियंत्रणाकरिता महिला सभासदांची तपासणी स्त्री आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत व पुरुष सभासदांची तपासणी पुरुष आरोग्य कर्माचाऱ्यामार्फत करण्यात येणार आहे. तरी 13 ते 28 सप्टेंबर 2019 दरम्यान घरोघरी जाऊन करण्यात येणार्‍या सर्वेक्षणाला सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने पत्रकार परिषदेत केले आहे.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, सहाय्यक संचालक संदीप गेडाम, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी प्रकाश साठे, उमेद अभियानाचे समन्वयक राहुल ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.