घराचा वापर अनधिकृतपणे प्रचारासाठी करू नये - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ सप्टेंबर २०१९

घराचा वापर अनधिकृतपणे प्रचारासाठी करू नये


आचारसंहितेचा काटेकोर पालन करा,भंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार निवडणूक निर्णय अधिकारी इंदिरा चौधरी 


हिंगणा- ५० विधानसभेत तीन लाख पंच्याहत्तर हजार नवशे चोवीस मतदार बजावणार मतदानाचा अधिकार 
नागपूर / अरूण कराळे 

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त यांनी येत्या २१ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम शनिवारी जाहीर करताच लगेच राज्यात आचारसंहिता लागू झाली असून तिचे काटेकोर पालन न केल्यास संबंधितांवर कार्यवाही करून गुन्हा दाखल केल्या जाणार असल्याची माहिती हिंगणा-५० विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी पत्रपरिषदेत दिली.

नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात पार पडलेल्या पत्रपरिषदेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या विस्तृत माहितीनुसार 

हिंगणा ५० विधानसभा क्षेत्रात एकूण ३, ७५, ९, २४ (तीन लाख पंच्याहत्तर हजार नवशे चोवीस मतदार असून १९८०८२ पुरुष , १७७८२७ महिला व इतर १५ असा समावेश आहे .तसेच यांमध्ये २७९ सैन्यदल , ८६४ अपंग तर ८९७ लिंग गुणोत्तर गटातील मतदार आहेत,त्याचप्रमाणे ३६२६२६ मतदार यादीत फोटो असलेले, १३२९८ फोटो नसलेले, १३२९८उर्वरीत मतदार,तर १२६०६ ओळखपत्र नसलेल्या मतदारांचा समावेश आहे.विधानसभा क्षेत्रात ४३४ मतदान केंद्रासाठी १९१० निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक केली त्यात ४७८ मतदान केंद्राध्यक्ष तर १४३२ निवडणूक अधिकारी आहेत,तसेच ७४ क्षेत्रीय अधिकारी, एमसीसी टीम लीडर एक,खर्च नियंत्रण पथक एक,चलचित्र पाहणी पथक एक,चलचित्र निगराणी पथक चार,भरारी पथक चार,स्थिर निगराणी पथक तीन तर नागरी दक्षता ऍप चार तसेच हिंगणा व नागपूर ग्रामीण तहसीलकरिता दोन कंट्रोल रूमचा समावेश केला गेला आहे.

आचारसंहिता सुरू होताच निवडणूक निर्णय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी संबंधित सर्व खात्याची तातडीची बैठक घेऊन या आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी सूचना देण्यात आल्या यांमध्ये शासकीय कार्यालयातील राजकीय नेते,पदाधिकारी यांचे फोटो २४ तासात काढणे,इमारतीवरील कोनशीला ४८ तासात काढणे,पब्लिक प्रॉपर्टीवरील असलेले पोस्टर,झेंडे,बॅनर्स ७२ तासात काढावी असे न केल्यास गुन्हे नोंदविले जाणार.

निवडणुकीतील खर्च,विविध परवानगी घेण्यासाठी एक खिडकी कक्ष हिंगणा तहसील कार्यालयात स्थापन केली जाणार सर्व प्रकारच्या परवानग्या उमेदवारांना त्या खिडकीतून दिल्या जाणार आहे.

उमेदवाराला दररोज खर्चाचा हिशोब नेमून दिलेल्या टीमकडे देने आवश्यक असून एका उमेदवाराला २८ लाख रुपयांपर्यंत निवडणूक खर्च करता येणार आहे.सीवीजी अॅप द्वारे सामान्य नागरिकाही आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार नोंदविता येणार आहे.

तसेच यानंतरची हिंगणा विधानसभा क्षेत्राची निवडणूक प्रक्रिया तसेच मतमोजणी हिंगणा तहसील कार्यालयात होणार असल्याची विस्तृत माहिती पत्रपरिषदेत इंदिरा चौधरी यांनी नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात दिली यावेळी नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले उपस्थित होते.

या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सामान्य,नागरिक,पक्ष कार्यकर्त्यांनी आपल्या घराचा वापर अनधिकृतपणे प्रचारासाठी करू नये .विनाकारण आचारसंहिता भंग केल्याच्या कार्यवाहिचे दुष्परिणाम भोगावे लागेल यासाठी.निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे व मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आव्हान इंदिरा चौधरी यांनी मतदारांना केले.