महावितरण:वीजचोरी प्रकरणी उद्योजकास ४२ लाख दंड व २ वर्षाची शिक्षा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ ऑगस्ट २०१९

महावितरण:वीजचोरी प्रकरणी उद्योजकास ४२ लाख दंड व २ वर्षाची शिक्षा

नागपूर/प्रतिनिधी:


      वीजमीटरमध्ये फेरफार करून व चेंजओव्हर स्वीच लावून विजेची चोरी करणाऱ्या ठाण्यातील उद्योजकास दोन वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा व ४२ लाख रुपयांचा दंड  ठाणे येथील सत्र न्यायालयाने नुकताच ठोठावला आहे.

  महावितरणच्या भांडूप नागरी परिमंडलांतर्गत येत असलेल्या मुंब्रा येथील शीळ फाटा येथे मोइनुद्दिन कुरेशी यांचा प्लॅस्टिकचा कारखाना आहे. दि. १९ एप्रिल २०१२ रोजी रात्री ११.३० वाजता तत्कालिन अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण दरोली यांनी आपल्या पथकासोबत या कारखान्यावर अचानकपणे धाड टाकली. यावेळी हा कारखानदार ग्राहक चेंजओव्हर स्वीच लावून रात्री ८:०० ते सकाळी ६.३० च्या दरम्यान विजेची चोरी करीत असल्याचे आढळून आले. 

या ग्राहकाने दोन वर्षात सुमारे १ लाख १६ हजार युनिट वीज अनधिकृत वापरल्यामुळे वीज अधिनियमाच्या कलम १३५ नुसार वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाने नुकताच निर्णय दिला असून कारखानदार मोइनुद्दिन कुरेशी याला ४२ लाख रुपये इतका दंड ठोठावला असून याशिवाय दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

 तसेच ४२ लाख दंडाची रक्कम न भरल्यास आणखी ९ महिने साधी कैद अशीही शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.