सुशिक्षित बेराजगार विद्युतअभियंत्यासाठी महावितरणचे स्वतंत्र पोर्टल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ ऑगस्ट २०१९

सुशिक्षित बेराजगार विद्युतअभियंत्यासाठी महावितरणचे स्वतंत्र पोर्टल

नागपूर /प्रतिनिधी:राज्यातील सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्यांना थेट लॉटरी पध्दतीने कामे मिळण्यासाठी महावितरणने आपल्या संकेतस्थळावर स्वतंत्र पोर्टल सूरू केले आहे. या पोर्टलवर गेल्या चार दिवसांत ५२ अभियंत्यांनी अर्ज केले आहे.

महावितरणच्या विभागीय कार्यालयांतर्गत करण्यात येत असलेल्या दहा लाखांपर्यंतच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांपैकी ५० टक्के कामे सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्यांना लॉटरी पध्दतीने वितरित करण्यात येत आहेत. सुशिक्षित बेराजगार विद्युत अभियंत्यांना ५० लाखांपर्यंत विजेची कामे देण्याची मर्यादा आखून देण्यात आली आहे. त्यांना पहिल्या वर्षी १० लाख रुपयांची कामे देण्यात येतील. त्यानंतर ४० लाख रुपयांची कामे देण्यात येणार असली तरी प्रत्येक कामाची कमाल मर्यादा ही १० लाख रुपये एवढी राहणार आहे.

पहिल्या वर्षात मिळालेली कामे सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्याने मुदतीत व यशस्वीपणे पूर्ण केली तर त्यांना दुसऱ्या वर्षी प्रत्येकी १५ लाख रुपयांची वार्षिक ५ कामे थेट लॉटरी पध्दतीने देण्यात येतील. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामाचे वितरण केल्यानंतर कार्यादेश देण्यापूर्वी भरावयाच्या बयाणा रमेत पूर्ण सूट देण्यात येणार असून सुरक्षा ठेवीच्या रक्कमेतही ५० टक्के सूट देण्यात येईल. संगणक प्रणालीद्वारे या अभियंत्यांची पुढील तीन वर्षांच्या कामाकरिता निवड करण्यात येईल.

या योजनेंतर्गत यापूर्वी  नोंदणीकृत असलेल्या ९३२  सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्यांना ११,४८२ लाख रक्कमेची १ हजार ९५४ कामे थेट लॉटरी पध्दतीने देण्यात आलेली आहेत. सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्यांनी महावितरणच्या  www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील पुरवठादार  पोर्टलवर जाऊन आपले नाव नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.