इरई धरणाचे ७ दरवाजे उघडले:नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ ऑगस्ट २०१९

इरई धरणाचे ७ दरवाजे उघडले:नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा


जिल्हा आपत्ती निवारण कक्षाची बचाव मोहीम सुरू
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 जिल्ह्यात अधून-मधून सुरू असलेल्या पावसामुळे इरई धरणातील पाण्याची पातळी वाढत असून इरई धरणाचे सर्व म्हणजेच सातही दरवाजे उघडण्यात आले आहे. तरी नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी सूचना प्रकाशित करण्यात येत असून जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून बचाव मोहिम राबविण्यात येत असून पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा आपत्ती निवारण कक्षाला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांच्या संततधार पावसामुळे इरई धरणाच्या पाण्याची पातळी वाढली असून जलविसर्ग करण्याकरिता धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे इरई नदीच्या जलपात्रात वाढ झाली असून शेजारील चिंचोळी, पाली, किटाळी, भटाळी, मीनगाव खैरगाव, विचोडा, अंभोरा, पडोली, कोसारा, वडगाव, दाताळा, चंद्रपूर, आरवट, माना, तसेच इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच गावकऱ्यांनी स्वतः, आपली गुरे व इतर मालमत्ता नदीच्या पात्रापासून दूर ठेवावी. जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 3 ऑगस्ट 2019 रोजी सरासरी 77.21 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये चंद्रपूर 52.6 मिमी, बल्लारपूर 80, गोंडपिपरी 31.2, पोंभूर्णा 47, मूल 95.4, सावली 91.2, वरोरा 81.8, भद्रावती 62.3, चिमूर 140.6, ब्रह्मपुरी 92.1, सिंदेवाही 170.3, नागभीड 94.2, राजुरा 37.7, कोरपना 44.5, जिवती 37.3 मिमी एवढया पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील चारगाव, चदई, लभानसराड, आसोलामेंढा, नलेश्वर अशी पाच धरणं 100 टक्के भरलेली असून डोंगरगाव 83 टक्के, घोडाझरी 56 टक्के, अमलनाला 47 टक्के भरलेले आहे.

 पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या खैरगाव, अंभोरा या ठिकाणी जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या शोध व बचाव पथकाने पाच व्यक्ती तसेच काही जनावरांचे प्राण वाचवले आहेत. अशी माहिती जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी जितेश सुरवाडे यांनी दिली. कुठलीही पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ आपत्ती निवारण कक्षाला सूचना द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.