आदर्श गाव घाटकुळचे पोपटराव पवार यांनी केले राज्यस्तरीय मुल्यांकन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ ऑगस्ट २०१९

आदर्श गाव घाटकुळचे पोपटराव पवार यांनी केले राज्यस्तरीय मुल्यांकन


गावक-यांशी संवाद 

नाविण्यपूर्ण उपक्रम व विकासकामाने गावात परिवर्तन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत राज्यस्तरावर आदर्श ग्राम स्पर्धा राबवण्यात येत आहे. राज्यातील एक हजार गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांनी केलेल्या कामामुळे गावे विकासाच्या प्रवाहात आली. आदर्श ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झालेल्या पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ गावाचे राज्यस्तरीय मुल्यांकन आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचेसह तज्ज्ञ समितीने केले व गावक-यांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील एक हजार गावे आदर्श करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबवले जात आहे. यात जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ग्रामविकासातील अग्रणी, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली कृषी संचालक अधिक्षक ज्ञानेश्वर बोटे, उपसंचालक प्रफुल तांबे, व्हिएसटीएफचे मिशन सहयोगी प्रफुल रंगारी, ख्याती मेनझेस, अक्षय प्रकाश यांच्या उपस्थितीत गावाची पाहणी करण्यात आली. 

स्पर्धेच्या मुल्यांकन समितीने व्हिएसटीएफच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आयएसओ नामांकित शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतीची पाहणी केली. आरोग्य, शिक्षण, कृषी, महिला सक्षमीकरण, बचत गट लघुउद्योग, बायोगॅस, गावाने गावासाठी केलेली वैशीष्टपुर्ण कामे, नाविण्यपूर्ण उपक्रम, श्रमदान, स्वच्छता, शोषखड्डे, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालय, शासकिय योजनांचा आढावा घेतला व मुल्यांकन केले. अंगणवाडी सेविका, कृषीसेवक, तलाठी, आरोग्यसेवक यांना गावासाठी केलेल्या विशेष कामांची विचारणा करण्यात आली. गावक-यांना मार्गदर्शनातून विविध प्रश्न उपस्थित करुन गावातील खरी परिस्थिती जाणून घेण्यात आली.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, पं.स उपसभापती विनोद देशमुख, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, तहसिलदार बिराजदार, व्हिएसटीएफचे जिल्हा समन्वयक विद्या पाल, रत्नशेखर गजभिये, टाटा ट्रष्टच्या मिनाक्षी अतकुलवार, दिप्ती पोहाडे, विस्तार अधिकारी कुर्झेकर, कृषी अधिकारी संदिप पहापळे, बालविकास अधिकारी अमोल मेरगळ, उमेदचे राजेश दुधे, अहिरकर, सरपंच प्रिती निलेश मेदाळे, उपसरपंच गंगाधर गद्देकार, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर, ग्रा.पं.सदस्य अरुण मडावी, पत्रू पाल, प्रज्ञा देठे, सुनिता वाकुडकर, कुसुम देशमुख, कल्पना शिंदे, रजनी हासे व ग्रामस्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. 

गावातील मुकुंदा हासे, स्वप्निल बुटले, राम चौधरी, अमोल झाडे, चांगदेव राळेगावकर, दिलीप कस्तुरे, गुणाकार पाल, जनहित व मराठा युवक मंडळ, बचत गटाच्या महिला तसेच ग्रामपरिवर्तक राहुल पडाल, गौरव केने, किशोर गोटमारे, रविराज अहिरे, निलेश खडसे, विशाल कुंभकर्ण, प्रेमदया कसदेकर, आकाश वैराळे, विशाल राठोड, सुपडा वानखेडे, सुमित तिवारी यांनी सहकार्य केले.

आदर्श गाव गावक-यांच्या हातात - पोपटराव पवार
पारंपारिक पद्धतीने बैलगाडीत बसवून राज्यस्तरीय समीतीचे स्वागत करण्यात आले. बैलगाडी चक्क पोपटरावांनी चालवली. गाव हागणदारीमुक्त असेल तरच गावात येईल या वक्तव्याने त्यांनी सुरुवात केली. नशाबंदी, हुंडाबंदी, चराईबंदी, कु-हाडबंदी, ग्रामसभेतील निर्णयप्रक्रियेत गावक-यांनी पुढाकार घ्यावा‌. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या गावाचे निर्णय आपणच घ्यावे. मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांच्या पुर्ण सहकार्यामुळे आदर्श गाव गावक-यांच्यांच हातात आहे. ते घडवण्याचे आवाहन पोपटराव पवार यांनी केले.

'लोकराज्य ग्राम' व ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळाचे लोकार्पन
जिल्हा माहीती अधिकारी प्रविण टाके, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर यांच्या पुढाकाराने गावातील प्रत्येक कुटुंबांना महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक दरमहा उपलब्ध होणार आहे. घाटकुळ हे जिल्ह्यातील पहिलेच 'लोकराज्य ग्राम' ठरले आहे. पाहुण्यांचे स्वागत देखील लोकराज्य मासिक देवून करण्यात आले. गावाची होणारी प्रगती पाहून गडचांदूर येथील सुकेश ठाकरे या अभियंत्याने ग्रामपंचायतीला संकेतस्थळ व मोबाईल अॅप बनवून दिले. यावेळी संकेतस्थळाचे लोकार्पन पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले.