इरफान शेख यांच्या "माझ्यातला कवी मरत चाललाय"कवितासंग्रहाला शेवंताबाई सरकाटे स्मृती विशेष पूरस्कार जाहीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ ऑगस्ट २०१९

इरफान शेख यांच्या "माझ्यातला कवी मरत चाललाय"कवितासंग्रहाला शेवंताबाई सरकाटे स्मृती विशेष पूरस्कार जाहीर

चंद्रपूर/प्रतिनिधी: 

भुसावळ येथील शेवंताबाई सरकाटे स्मृती प्रतिष्ठान चा सन २०१९ चा विशेष काव्यसंग्रह पुरस्कार चंद्रपूरचे कवी इरफान शेख यांच्या "माझ्यातला कवी मरत चाललाय" या चर्चित कवितासंग्रहाला जाहीर झालेला आहे. रोख रक्कम, शाल, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवार दिनांक ८ सप्टेंबर २०१९ ला नांदुरा येथे मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी रेलवे पोलिस आयुक्त रमेश सरकाटे यांनी दिली. 

माझ्यातला कवी मरत चाललाय या कवितासंग्रहाला मिळालेला बारावा महत्वाचा साहित्य पुरस्कार आहे. चंद्रपूरकर साहित्यक्षेत्रासाठी ही महत्त्वाची आणि अभिमानाची बाब आहे. इरफान शेख यांचा माझ्यातला कवी मरत चाललाय हा कवितासंग्रह पुण्याच्या संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केला असून या काव्यसंग्रहाला नाशिकचा नारायण सुर्वे पुरस्कार, नागपूरचा शरच्चंद्र मुक्तीबोध पुरस्कार, पुणेचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, कळमेश्वर येथील साहित्ययात्री पुरस्कार, औरंगाबाद मधील अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य महामंडळाचा पुरस्कार, नाशिकचा साहित्यकणा फाउंडेशनचा पुरस्कार, अमरावतीचा सुर्यकांतादेवी पोटे साहित्य पुरस्कार, सुदाम सावरकर स्मृती पुरस्कार, बेळगाव येथील वाङ्मय चर्चा मंडळाचा पुरस्कार, इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिराचा पुरस्कार आणि नाशिक येथील नाशिक कवी पुरस्कार प्राप्त झालेले आहे.

 इरफान शेख यांनी आपल्या कवितासंग्रहाच्या माध्यमाने हे प्रतिष्ठित पुरस्कार चंद्रपूरला मिळवून दिले आहे. या कवितासंग्रहाची पहिली आवृत्ती अल्पावधीतच संपली असून महाराष्ट्रातल्या नामवंत कवींनी आणि समीक्षकांनी या कवितासंग्रहावर लेखन केलेले आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ किशोर सानप यांनी या कविता संग्रहाला प्रदीर्घ अशी प्रस्तावना लिहिली आहे. लवकरच या कवितासंग्रहाचा हिंदी अनुवाद प्रकाशित होत आहे. इरफान शेख यांची तोरण ही कविता गोंडवाना विद्यापीठात बी ए द्वितीय वर्षात तृतीय सत्रात अभ्यासक्रमात असून मराठीतल्या नामवंत दिवाळी अंकात आणि नियतकालिकात इरफान शेख सातत्याने कविता लेखन करतात. प्राचार्य डॉ राजेश इंगोले, माजी नगरसेवक संजय वैद्य, यांचेसह शहरातील अन्य मान्यवरांनी या कवितासंग्रहासाठी सहकार्य केले असून संग्रह लोकप्रिय झालेला आहे.

 सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर या साहित्यविषयक लोक चळवळीचे इरफान शेख अध्यक्ष असून विदर्भ साहित्य संघाच्या गोंडवन शाखेचे सचिव आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह अन्य मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी असणारे इरफान शेख यांची प्रदीर्घ मुलाखत नुकतीच मुंबई येथील रामप्रहर दैनिकाने प्रकाशित केली आहे.

 त्याचबरोबर बेळगावच्या सकाळ आवृत्तीने त्यांची मुलाखत प्रकाशित केली आहे,. चंद्रपूर आकाशवाणी ने त्यांची दोन भागात मुलाखत प्रक्षेपित केली आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारासाठी त्यांचे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.