गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी महावितरणने कसली कंबर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ ऑगस्ट २०१९

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी महावितरणने कसली कंबर


नागपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाच्या आगमनाला काही दिवसच शिल्ल्क असून येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पडावा यासाठी ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा म्हणून वीज वाहिन्या व वीज उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने पुर्ण करावयाच्या सुचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी सर्व क्षेत्रिय कार्यालयांना दिल्या आहेत.

वीज तारांच्या लगतच्या झाडांच्या फ़ांद्या तोडणे, रोहीत्रे, वितरण पेट्यांची आवश्यक ती दुरुस्ती करणे, उपकेंद्रातील उपकरणांची तपासणी व दुरुस्ती करणे, नादुरुस्त असलेले किटकॅट बदलविणे, रहदारीच्या ठिकाणी लघुदाव व उच्चदाब वाहिन्यांचे गार्डिंग व्यवस्थित करून घेणे, योग्य क्षमतेचे वितळ तार (फ़्यूज वायर) टाकणे, विभागिय, मंडळ आणि क्षेत्रिय स्तरावरील नियंत्रण कक्ष तीन्ही पाळ्यांत (24X7) सुरु ठेवणे आदी कामे प्राधान्याने करण्याचे निर्देशही घुगल यांनी दिले आहेत.

सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २७ पैसे अधिक १ रुपया २८ पैसे वहन (व्हिलींग) आकार असे वीजदर आहेत. सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात वीज वापरली तरीही शेवटच्या युनिटपर्यंत केवळ ४ रुपये ५५ पैसे प्रतीयुनिट एवढाच दर आकारण्यात येईल.

 गणेशोत्सवाकरिता गणेशमंडळांना तात्पुरत्या स्वरुपातील वीजपुरवठा नियमाप्रमाणे आणि त्वरीत देण्याच्या सुचना सर्व अधिनस्थ अधिकारी व कर्मचा-यांना देण्यात आल्या असून गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग असल्याने अश्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वीज अपघात होणार नाही यासाठी स्थानिक कर्मचारी व अधिका-यांनी दक्ष राहून योग्य त्या उपाययोजना करणे, सार्वजनिक उत्सवांकरिता अधिकृत वीज जोडणी घेणे आवश्यक असल्याने अश्या ठिकाणी अनधिकत वीजजोडणी आढळलेल्या मंडळांना दामिनी पथकाव्दारे अपघात टाळण्याकरिता सुरक्षा व वीज चोरीच्या परिणामांबाबत जाणीव करुन देत त्यांना अधिकृत वीज जोडणी घेण्याबाबत प्रवृत्त करावे याशिवाय जे मंडळ अधिकृत वीज जोडणी घेण्यास पुढाकार घेणार नाहीत अश्या मंडळांचा वीज पुरवठा सुरक्षेच्या दृष्टीने ताबडतोब बंद करून त्यांचेविरोधात नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सुचनाही प्रादेशिक संचालकांनी दिल्या आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी विसर्जन स्थळांवर मागणी करण्यात आलेला तात्पुरता वीजभार त्वरीत देण्यात यावा, याशिवाय विसर्जनाच्या दिवशी वीजपुरवठा अखंडित राहील यासाठी विभागिय अधिकारी, उपविभागिय अधिकारी व शाखा अधिकारी यांनी विसर्जन प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत स्वत: जातीने उपस्थित राहण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत.

संपुर्ण गणेशोत्सव काळात सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी मुख्यालयी असणे बंधनकारक असून सक्षम अधिका-यांच्या परवानगीशिवाय कुणीही मुख्यालय सोडू नये, गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुक मार्गावरील उपरी वाहिन्यांचा मिरवणुकीतील मुर्ती किंवा देखावे यांना अडथळा होणात नाही याची अगोदरच सर्वेक्षण करून त्याअनुषंगाने तजबीज करावी, दिलेल्या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन जनमित्र पातळीपर्यंत याबाबत सर्वांना आवश्य्क ते दिशानिर्देश देण्याचे आवाहनही दिलीप घुगल यांनी केले आहे.