मुख्यालयी न राहणे MSEB च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडणार महागात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ जुलै २०१९

मुख्यालयी न राहणे MSEB च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडणार महागात

दिलीप घुगल यांचा अधिकारी कर्मचाऱ्यांना अल्टीमेटल
नागपूर/प्रतिनिधी:

 मुख्यालयी न राहणाऱ्या महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर यापुढ़े कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा महावितरण नागपूर परिक्षत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालकआणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता  दिलीप घुगल यांनी आज येथे आयोजित बैठकीत दिला.

मंगळवारी मुख्य अभियंता  दिलीप घुगल यांनी काटोल रोड येथील कार्यालयात नागपूर परिमंडलातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांची त्रैमासिक आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, अनेक ठिकाणी कर्मचारी नेमून दिलेल्या मुख्यालयी राहत नाहीत. परिणामी पावसाळ्याच्या काळात वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना दीर्घ काळ अंधारात राहावे लागते. परिणामी ग्राहकांमध्ये असंतोष वाढतो. यापुढे असा प्रकार अजिबात खपवुन घेतल्या जाणार नाही. कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी मुक्कामास आहेत कि नाहीत याची खात्री करणे ही संबंधित  विभागीय अधिकाऱ्याची जवाबदारी असून कर्मचारी खरोखर मुख्यालयी राहतात कि नाही याची पडताळणी करण्यासाठी परिमंडल कार्यालयातून चमू पाठवून खात्री करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

वीज उपकेंद्रात कोणत्याही कारणामुळे वीज पुरवठा बंद असल्यास याची नोंद संगणकीय प्रणालीत या पुढे करणे  अनिवार्य राहणार आहे. विभागीय कार्यालयाने आपल्या अधिनस्त येणाऱ्या सर्व वीज उपकेंद्रात या पद्धतीने काम होत आहे कि नाही याची खात्री करून घेण्याची सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी केली. चुकीची माहिती संगणकीय प्रणालीत भरल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाईचा इशारा यावेळी उपस्थितांना देण्यात आला.  परिमंडलात वीज गळती रोखून कंपनीच्या महसुलात वाढ करणे, १००%वीज देयकाची वसुली करणे, दोन टक्के वीज ग्राहकांच्या मीटर वाचनाच्या नोंदी तपासणे, कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकाची जोडणी तपासणे सोबतच वीज देयकांच्या संदर्भात तक्रारी राहू नये यासाठी नादुरुस्त वीज मीटर तात्काळ बदलण्याच्या सूचना यावेळी मुख्य अभियंता घुगल यांनी दिल्या.

 बैठकीस अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, दिलीप दोडके, डॉ. एस.एफ वानखेडे, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, कुलदीप भस्मे, प्रफुल लांडे, निलेश गायकवाड, स्वप्नील गोतमारे, राजेश घाटोळे, दिलीप घाटोळ, दीपाली माडेलवर, दिलीप मोहोड, अमित परांजपे,  आदींसह नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते .