स्वच्छ सुंदर आदर्श गावासाठी बचत गटांच्या महिलांचे श्रमदान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ जुलै २०१९

स्वच्छ सुंदर आदर्श गावासाठी बचत गटांच्या महिलांचे श्रमदान

घाटकुळ येथील महिला बचत गटांचा पुढाकार
पोंभुर्णा/प्रतिनिधी:

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट ग्रामपंचायत घाटकुळ ची आदर्श गावाकडे वाटचाल सुरू आहे. याकरिता निर्मल महिला ग्रामसंघ, जनहित व मराठा युवक मंडळ, गावातील सर्व महिला बचत गटांनी गावासाठी पुढाकार घेतला आहे. गावातील भरलेल्या गटारी महिला बचत गटांच्या महिलांनी श्रमदानातून उपसा करून ग्राम विकासात मोठे योगदान दिले आहे.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत समाविष्ट राज्यस्तरावर आदर्श गाव स्पर्धेत घाटकुळ गावाचा समावेश आहे. या अनुषंगाने निकषानुसार विकास कामे ग्रामपंचायतीने केली आहेत. आदर्श ग्राम व आगामी स्मार्ट ग्राम च्या निमित्ताने गावाला अव्वल बनवण्याचा संकल्प बचत गटांच्या महिलांनी केला असून श्रमदानातून गावाला स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

घाटकुळ येथील दलित वस्ती परिसरातील गटारी महिलांनी स्वच्छेने उपसून सुमारे सहा ट्रॅक्टर केरकचरा व साचलेला गाळ श्रमदानातून बाहेर काढला. विशेषता यासाठी एक दिवसाची महिलांनी शेती कामाला सामूहिक सुट्टी घेऊन परिश्रम घेतले. 

यात निर्मल महिला ग्राम संघाच्या प्रतिमा दुधे, शशिकला देठे, महानंदा देठे, प्रज्ञा देठे, भाग्यश्री देठे, वच्छला देठे, गीता देठे, प्रियदर्शनी दुधे, उर्मिला खोब्रागडे, मंदा पेरकर, परशीला पेरकर, निर्मला देठे यांनी पुढाकार घेऊन सामाजिक परिवर्तन घडवले. अशोक देठे, गिरीश देठे, शामराव देठे, मेघराज देठे, सुनील डायले, महेश डायले, भाऊजी डायले, श्यामसुंदर राऊत, संजय पेरकर, गणपती राऊत, विठ्ठल दुधे यांनीही महिलांना सहकार्य करत श्रमदान केले. यावेळी ग्रा.पं. सरपंच प्रीती निलेश मेदाळे, ग्रामसेवक ममता बक्षी, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर, ग्रा.पं.सदस्य अरुण मडावी उपस्थित होते. पं.स. उपसभापती विनोद देशमुख यांनी गटारीतील गाळ विल्हेवाट लावण्याकरिता स्वच्छेने ट्रॅक्टर उपलब्ध करून देवून महिलांना प्रोत्साहन दिले. महिलांच्या पुढाकाराने ग्रामनिधीची बचत झाली असून इतर गावांसाठी स्वच्छता व श्रमदानाचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचे मत गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी व्यक्त केले.

 शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतीला आय.एस.ओ नामांकन

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत घाटकुळ येथील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र व ग्रामपंचायतीला आय.एस.ओ नामांकन मिळाले आहे. गावात अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहे. ग्रामपंचायतीने राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने घाटकुळ गावाने ग्रामीण विकासात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. लोकसहभागातून आदर्श व स्मार्ट ग्राम कडे गावाची वाटचाल सुरु आहे. 
पत्नीचा सहभाग बघून पती आले श्रमदानाला
घाटकुळ येथील प्रज्ञा गिरीश देठे या ग्रामपंचायत सदस्य आहेत. विविध उपक्रमात त्या सक्रिय असतात. त्यांनी त्यांच्या वॉर्डात तुडुंब भरलेल्या गटारी बचत गट महिलांच्या माध्यमातून श्रमदानातून उपसण्यासाठी पुढाकार घेतला. त्या स्वतः श्रमदान करताना पाहून त्यांचे पती श्री. गिरीश देठे स्वतः श्रमदानासाठी घरातील पावळं घेऊन आले व नाली उपसायला सुरुवात केली. श्रमदानाचे ते विशेष आकर्षण ठरले. पती-पत्नीचा हा पुढाकार गावासाठी आदर्श ठरला आहे.