भविष्यातील सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी चंद्रपूर सैनिकी शाळेचे असावेत:मुनगंटीवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ जुलै २०१९

भविष्यातील सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी चंद्रपूर सैनिकी शाळेचे असावेत:मुनगंटीवार

Image may contain: 1 person, standing and outdoor

ऑपरेशन विजय, अर्थात 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्ध जिंकण्याचा दिवस. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या चंद्रपूर सैनिकी शाळेमध्ये आज देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात कारगिल दिवस साजरा करण्यात आला. यावेळी या शाळेत दाखल झालेल्या सैनिकी पेहरावातील पहिल्या तुकडीला संबोधित करताना राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भविष्यामध्ये या शाळेचा विद्यार्थी आर्मी, नेव्ही किंवा एअर फोर्सचा प्रमुख व्हावा व त्याने गर्वाने चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचे नाव सांगावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
Image may contain: one or more people, people sitting, people standing, crowd, table and outdoor

चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन लवकरच प्रधानमंत्री किंवा संरक्षण मंत्र्यांच्याहस्ते होणार आहे. मात्र सैनिकी शाळेच्या नियमानुसार या ठिकाणची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून 90 विद्यार्थ्यांची सहाव्या वर्गाची पहिली तुकडी अभ्यासक्रमाला लागली आहे. आज कारगिल विजय दिवसाच्या शुभ पर्वावर चंद्रपूर सैनिकी शाळेने देशभक्तीने ओतप्रोत कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सैनिकी शाळेसाठी प्रेरणास्थान ठरलेले सर्जिकल स्ट्राइक मधील मुख्य भूमिका असलेले लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर आणि ज्यांनी अथक पाठपुरावा व विक्रमी वेळेत 123 एकरा मधील सैनिकी शाळा चंद्रपूरकरांना लोकार्पित केली, असे राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत या कार्यक्रमाला लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, एअर व्हाईस मार्शल(सीनियर ॲडमिन एअर स्टाफ ऑफिसर) बी. मणिकंटन, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर अंजलीताई घोटेकर, विभागीय मुख्य अभियंता उल्हास देबडवार, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सैनिकी शाळेचे प्राचार्य स्कॉर्डन लिडर नरेशकुमार, उपप्राचार्य लेप्ट कमांडर अनमोल, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, बल्लारपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांची देखील उपस्थिती होती.

आज कारगिल दिनी या सैनिकी शाळेमध्ये दिल्लीच्या इंडिया गेट प्रमाणे तयार करण्यात आलेल्या अमर जवान ज्योतीवर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तत्पूर्वी त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना हस्तांदोलन केले. यानंतर अवघ्या बारा, तेरा वर्षाचे असणारे सैनिकी पेहरावातील विद्यार्थ्यांनी सैनिकी शिस्तीत पालकमंत्र्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. उपस्थित सर्व 90 विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना सलामी दिली. हा क्षण पालकमंत्र्यांना भावूक करणारा ठरला.

त्यानंतरचा सैनिकी शाळेतील विस्तीर्ण मैदानावरचा कार्यक्रम सैनिकी शिस्तीचा वेगळा आविष्कार होता. सैनिकी शाळेचे गीत, एअर फोर्स दलाच्या बँडचे संचालन व शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेले चित्तथरारक प्रात्यक्षिक लक्षवेधी होते.
यावेळी संबोधित करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सैनिकी शाळेच्या निर्मितीमागील भूमिका व प्रेरणा विषद केली. देशातील 712 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक वाघ असणारा जिल्हा चंद्रपूर आहे. त्यामुळे या सैनिकी शाळेतून निघालेला एक एक विद्यार्थी या देशाचा नावलौकिक वाढविणारा विद्यार्थी असेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सैनिकी शाळा उभारण्यासाठी राजेंद्र निंभोरकर यांनी केलेल्या वेळोवेळी मदतीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ही सैनिकी शाळा विक्रमी 14 महिन्यात तयार झाली आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सैनिकी शाळेच्या निर्माणाचे काम करणारे कामगार देखील उपस्थित होते. त्यांचे देखील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आभार मानले. तुम्ही केवळ सैनिकी शाळा उभारली नाही तर देश मजबूत करणाऱ्या पिढीच्या मजबुतीसाठी काम केलेले आहे. भारत मातेच्या या कामगार सुपुत्रांनी आपले दायित्व व्यक्त केले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या कामामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी, संस्थांनी पुढाकार घेतला त्या सर्वांचे यावेळी त्यांनी आभार मानले. 

4 ऑगस्ट रोजी चंद्रपूरला आमीर खान यांच्याहस्ते मिशन शक्तीला सुरुवात होत असून येत्या ऑलम्पिकमध्ये चंद्रपूर, गडचिरोलीतील क्रीडापटूंनी ऑलम्पिकमध्ये मेडल मिळावे, ही आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूरची सैनिकी शाळा हे आपले एक स्वप्न असून खरा आनंद जेव्हा हा या शाळेतला विद्यार्थी वीस-पंचवीस वर्षांनंतर देशाच्या आर्मी दलाचा प्रमुख असेल, नेव्ही दलाचा प्रमुख असेल किंवा एअरफोर्समध्ये महत्त्वाच्या पदावर असेल तेव्हाच मिळेल.

 हा अधिकारी जेव्हा सांगेल की, होय ! मी चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचा विद्यार्थी आहे. तेव्हा मला आणखी समाधान मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. सैनिकी शाळेच्या परिसरात त्यांनी आज फेरफटका मारला व नव्या कामाची पाहणी केली. त्यानंतर पहिल्या तुकडी सोबत छायाचित्र देखील काढले. यावेळी चंद्रपूर-बल्लारपूर शहरातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.