सहज, सुलभ व सरळ कामाचा वस्तुपाठ ट्रेझरी कार्यालयाने घालावा : मुनगंटीवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ जुलै २०१९

सहज, सुलभ व सरळ कामाचा वस्तुपाठ ट्रेझरी कार्यालयाने घालावा : मुनगंटीवार

महाराष्ट्रातील सर्वाधिक अद्ययावत चंद्रपूर लेखा कोष भवनाचे थाटात लोकार्पण

चंद्रपूर/प्रतिनिधी:चंद्रपूर जिल्ह्यातील नवनिर्मित जिल्हा कोषागार कार्यालय हे महाराष्ट्रातील उत्तम लेखा कोष भवन आहे. एका सुंदर व उत्तम कामासाठी पूरक पायाभूत सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक माणसाचे समाधान या ठिकाणी झाले पाहिजे. चंद्रपूरच्या ट्रेझरीने सहज,सुलभ व सरळ कामाचा वस्तुपाठ महाराष्ट्र पुढे उभा करावा ,असे आवाहन राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम अशा लेखा व कोषागार भवनाचे आज थाटात लोकार्पण झाले. चार मजली वातानुकूलित ही इमारत असून वाहनतळ, विंधन विहीर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वयंचलित लिफ्ट, सीसीटीव्ही कॅमेरा, विश्रांतीकक्ष व चौथ्या मजल्यावरील सुसज्ज सभागृह या इमारतीचे वैशिष्ट्य आहे. ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात उभ्या झालेल्या गेल्या चार वर्षातील अनेक नव्या इमारतींपैकी एक उत्कृष्ट इमारत म्हणून लेखा व कोषागार भवन पुढे आले आहे. महाराष्ट्रातील वित्त विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या इमारतीचे लोकार्पण केले.


यावेळी आ. नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, प्रधान सचिव नितीन गद्रे         (लेखा व कोषागारे ), जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, अधीक्षक अभियंता श्रीमती सुषमा साखरवाडे, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता पाटील,संचालक ( लेखा व कोषागरे ) जयगोपाल मेनन, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, चंद्रपूर कोषागार अधिकारी ध.म.पेंदाम आदी उपस्थित होते.


जिल्ह्यातील कोषागार  भवनाची मागणी  आणि अनेक दिवसांपासून होती. 1984 पासून जुन्या इमारतीमध्ये  कोषागार कार्यालयाचे कामकाज सुरू होते. 


या लोकार्पण सोहळयाला संबोधित करताना पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नव्या इमारतीमध्ये आता नियोजन ,दर्जा आणि गती याबाबतच्या पीक्यूएस ( प्लॅनिंग, क्वॉलिटी, स्पीड ) या त्रिसूत्रीचा वापर करून काम करावे असे आवाहन केले. कोषागार विभाग नियमित अन्य विभागांना निर्देश देत राहतो. इतर विभागांना अतिशय उत्तम कामाची प्रेरणा देखील देण्याचे कार्य या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून घडावे, असे आवाहनही त्यांनी केले.


यावेळी संपूर्ण राज्यातील कोषागार, मुद्रांक शुल्क व जीएसटी कार्यालयाचे बांधकाम टप्प्याटप्प्याने करण्याबाबत आपण विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यालयाची कामे आर्थिक शिस्त लावण्याची असून याठिकाणी उत्तम पद्धतीचे वातावरण असावे व या वातावरणात सामान्य नागरिकाला सहज, सुलभ व सरळ कामाची पूर्तता व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


 नव्या इमारतीच्या देखभालीचे दायित्व सर्व कर्मचाऱ्यांनी देखील घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आयुष्याची अनेक वर्षे ज्या कार्यालयात दहा-दहा तास काम करतो, ज्या कार्यालयाच्या बळावर आमची घरे चालतात, त्या ठिकाणचे वातावरण, सुविधा व इमारतीचा दर्जा चांगला रहावा, ती इमारत चांगली राहावी याबाबत सर्वांनीच आपली भूमिका अदा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. इमारतीच्या देखभालीकडे माझी इमारत म्हणून पहाणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


लेखा व कोषागारे विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांनी विक्रमी वेळात ही इमारत उभी झाली. याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कौतुक केले. मात्र, वित्त मंत्र्यांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे त्यांनी दिलेल्या काल मर्यादेच्या आत ही इमारत आम्ही पूर्ण करू की नाही याबाबत शंका होती.  त्यामुळे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याचे सांगितले. राज्यामध्ये वित्त विभागाचे संपूर्ण संगणकीकरण झाले असून बजेट सिस्टमला प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले .यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकोषागार अधिकारी रवींद्र पांडे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा कोषागार अधिकारी ध.म.पेंदाम यांनी केले.


यावेळी विभागातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांचे देखील स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कोषागार विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या नव्या इमारतीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियोजन भावना नंतर आणखी एक सुंदर इमारत प्रशासनाच्या सेवेत आली आहे.