जरीपटका परिसरात केला वीज बचतीचा जागर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ जून २०१९

जरीपटका परिसरात केला वीज बचतीचा जागर

मनपा-ग्रीन व्हिजीलद्वारे पोर्णिमा दिवस उपक्रम : अनावश्यक वीज दिवे बंद करून केली ऊर्जा बचत

नागपूर/प्रतिनिधी : ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे. त्यासाठी अनावश्यक वीज वापरण्यावर स्वत:हूनच बंधने आणायला हवी. दैनंदिन वापरात अनावश्यक वीज दिवे बंद केल्यास ऊर्जा बचतीत प्रत्येकाचा हातभार लागू शकतो. पोर्णिमा दिवस हा उपक्रम ऊर्जाबचतीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. नागपूरची या उपक्रमामुळे वेगळी ओळख तयार झाली आहे. त्यामुळे नागपुरातील प्रत्येक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन ऊर्जा बचतीचा नवा आदर्श घालून द्यावा, असे आवाहन मनपाचे अधिकारी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी केले.

नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून ऊर्जाबचतीच्या दृष्टीने पोर्णिमा दिवस हा विधायक उपक्रम तत्कालीन महापौर आमदार प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक पोर्णिमेच्या उजेड्या रात्री अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात येते. त्याला प्रतिसाद देत नागरिकही या विधायक उपक्रमात सहभागी होतात. सोमवारी (ता. १७) जरीपटका चौकातील जिंजर मॉल येथे पोर्णिमा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. 

महापौर नंदा जिचकार आणि मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या उपअभियंता कल्पना मेश्राम आणि मंगळवारी झोनचे शाखा अभियंता एन.बी. सालोडकर आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात मनपा कर्मचारी आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी जिंजर मॉलमधील व्यापाऱ्यांना अनावश्यक वीज दिवे रात्री ८ ते ९ या वेळात बंद करण्याचे आवाहन केले. 

आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी अनावश्यक वीज दिवे बंद करीत विधायक उपक्रमात सहभाग नोंदविला. मनपाच्या वतीनेही परिसरातील अनावश्यक पथदिवे बंद करण्यात आले होते. ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्यासह ग्रीन व्हिजीलच्या सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, दादाराव मोहोड, दिगांबर नागपुरे यांनी पोर्णिमा दिवस उपक्रमाच्या माध्यमातून व्यापारी व नागरिकांमध्ये जनजागृती केली.