भंडाऱ्यात भीषण अपघात:काळीपिवळी नदीत कोसळून सहा ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ जून २०१९

भंडाऱ्यात भीषण अपघात:काळीपिवळी नदीत कोसळून सहा ठार

मृतांमध्ये ५ विद्यार्थीनी, चुलबंद नदीपुलावरील घटना
भंडारा/प्रतिनिधी(मनोज चीचघरे) :

 भरधाव असलेल्या काळीपिवळीचा टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली काळीपिवळी पूलावरून थेट ८० फुट नदीत कोसळली. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये पाच विद्यार्थीनी व एका महिलेचा समावेश आहे. मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास लाखांदूर मार्गावरील धर्मापूरी येथील चुलबंद नदीपुलावर ही घटना घडली.

गुणगुण हितेश पालांदूरकर (१५) रा. गोंदिया, शितल सुरेश राऊत (१२) रा. सानगडी, अश्विनी सुरेश राऊत (२२) रा. सानगडी, शिल्पा श्रीरंग कावळे (२०) रा. सासरा, सुरेखा देवाजी कुंभरे (१८) रा. सानगडी व शारदा गजानन गोटेफोटे (५५) रा. सासरा अशी मृतकांची नावे आहेत. तर जखमींमध्ये डिम्पल श्रीरंग कावळे (१७) रा. सासरा, शुभम नंदलाल पाथोडे (१८) रा. तई/बारव्हा, वंदना अभिमन सतीमेश्राम (४०) रा. सासरा/कटंगधरा, मालण टेंभूर्णे (४०) रा. खोलमारा ता. लाखांदूर, रिद्धी हितेशराव पालांदूरकर (५) रा. गोंदिया, विणा हितेशराव पालांदूरकर (३४) रा. गोंदिया, अभिमन सतीमेश्राम (४५) रा. सासरा, ईमानी हेडावू (१९) रा. सानगडी, शीतल खर्डेकर रा. सानगडी यांचा समावेश आहे.

मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास प्रवाशांनी खचाखच भरलेली काळीपिवळी क्र. एमएच ३१ एपी ८२४१ साकोलीवरून लाखांदूरच्या दिशेने जात होती. धर्मापूरी येथील चुलबंद नदीपुलावर काळीपिवळी येताच टायर फुटल्याने काळीपिवळी अनियंत्रित झाली व पुलाचे कठडे तोडून ८० फुट नदीत कोसळली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. काळीपिवळीचे तर अक्षरश: चिंधड्या उडाल्या. घटनेनंतर नागरिकांची एकच गर्दी घटनास्थळी झाली होती. पोलिसांनीही लगेच धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलविले. 

यापैकी तीन जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सानगडी व सासरा परिसरातील विद्यार्थीनी नुकत्याच १२ वी उत्तीर्ण झाल्या होत्या. व साकोली येथील महाविद्यालयात प्रवेशासाठी आल्या होत्या. घटनास्थळी पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी भेट दिली. साकोली पोलिस अधिक तपास करीत आहेत.