वीज यंत्रणेवरील केबलचे जाळे हटवा:महावितरणचे केबल ऑपरेटरला आवाहन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ जून २०१९

वीज यंत्रणेवरील केबलचे जाळे हटवा:महावितरणचे केबल ऑपरेटरला आवाहन

नागपूर/प्रतिनिधी:

महावितरणच्या यंत्रणेतील वीज खांबांवर उच्च व लघुदाब वाहिन्यांना समांतर असे टीव्ही वाहिन्यांचे केबल बेकायदेशीररित्या टाकलेल्या आहेत या केबलमुळे विज यंत्रणेत अडथळा निर्माण होत असून प्रसंगी प्राणांकीत अपघाताची देखील शक्यता आहे, त्यामुळे केबल ऑपरेटर्सनी तात्काळ काढाव्यात असे आवाहन महावितरण तर्फे करण्यात आले आहे

महावितरणच्या वितरण यंत्रणेतील वीजखांब, उच्च व लघुदाब वाहिन्या, रोहित्र आदी ठिकाणी केबल टाकणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या यंत्रणेवरील केबलचे अतिक्रमण हटविण्याबाबत निर्देशही दिले आहेत. महानेट या ग्रामीण इंटरनेट जोडणी प्रकल्पाच्या केबल जिथे उपरी मार्गाद्वारे नेल्या आहेत अशा ठिकाणी महावितरणचे वीज खांब व संबंधित पायाभूत सुविधा वापरास शासनाने परवानगी दिलेली आहे. बेकायदेशीर केबलमुळे अपघात किंवा नुकसान झाल्यास संबंधित केबल ऑपरेटर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असून या प्रकरणात संबंधित केबल ऑपरेटर विरोधात नुकसान भरपाईचा दावा देखील करण्यात येणार आहे. 

केबल हटविण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर संबंधित कार्यक्षेत्रातील शाखा अभियंता व जनमित्रांवर जबाबदारी दिली असून या बेकायदेशीर प्रकाराबाबत उपविभागीय अभियंता व कार्यकारी अभियंता क्षेत्रीय भेटी दरम्यान तपासणी करणार आहेत. या तपासणी दरम्यान वीज वितरण यंत्रणेवर टीव्हीचे केबल आढळून आल्यास संबंधित शाखा अभियंता व जनमित्रांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.