ग्राहकांची समस्या समजून तक्रारींचे तात्काळ निवारण करा:दिलीप घुगल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ जून २०१९

ग्राहकांची समस्या समजून तक्रारींचे तात्काळ निवारण करा:दिलीप घुगल

नागपूर/प्रतिनिधी: 

पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीज यंत्रणेत होणारे बिघाड त्वरीत दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा देण्याबरोबर सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचा-यांनी मुख्यालयी राहून ग्राहकांची समस्या समजून तक्रारींचे तात्काळ निवारण करा, वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार असेल तर त्यांना याबाबत अवगत करून या दिवसात सर्वोतपरी सजग राहण्याचे आवाहन वजा निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार प्रादेशिक संचालकांनी अमरावती, यवतमाळ या मंडलातील कामकाजाचा नुकताच विस्तृत आढावा घेतला. सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपापसात समन्वय साधून कंपनीचे हित जपण्यासाठी काम करावे, आपली जवाबदारी योग्यरित्या पार न पाडणा-या अधिका-यांना कारणे दाखवा नोटीसेस बजावून त्यांची बदली इतरत्र करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. सध्या पावसाचे व वादळवा-याचे दिवस असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास युद्धपातळीवर सुधार कार्य हाती घेवून शक्य तितक्या लवकर विजपुरवठा सुरु होण्यासाठी प्रयत्नरत राहा. महसुल वसुली आणि थकबाकी यांचा सविस्तर आढावा घेतांनाच वसुली कार्यक्षमता कमी असलेल्या विभागांनी सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

वितरीत केलेल्या विजेची वसूली करणे व आपल्या ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे ही महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दिलेली जबाबदारी झटकून चालणार नाही. अनियमितपणे वीजबिल भरणा-या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याच्या स्पष्ट सुचना दिलीप घुगल यांनी दिल्या. ग्राहक सेवेत निष्काळजीपणा व कामचूकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर याआधीच कारवाई करण्यात आली आहे. पण, ही परिस्थिती अशीच पुढे चालत राहीली तर अशा कामचूकार कर्मचाऱ्यांची गय करण्यात येणार नाही व त्यांना परिमंडळाबाहेर बदली करण्याचा गर्भीत इशाराही यावेळी त्यांनी दिला. तसेच शहरांची वितरण हानी कमी करण्यासाठी वीज चोरी पकडणे, तात्काळ नवीन वीज जोडणी देणे, वीज चोरांवर गुन्हे दाखल करणे व प्रगतीपथावरील कामे वेळेत पूर्ण करण्यासोबतच त्यास दर्जेदार करण्याचे आवाहन केले. तद्नंतर प्रादेशिक संचालक यांनी अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील कंत्राटदार यांचेशी संवाद साधीत ग्राहक सेवेसाठी देखभाल व दुस्तीच्या कामाच्या निविदेला प्रतिसाद देवून कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले.

या बैठकीला अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, अमरावती अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे व यवतमाळ अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांचेसह सर्व कार्यकारी अभियंते व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.