जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत चंद्रपूरचा कार्तिकेय गुप्ता देशात प्रथम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ जून २०१९

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत चंद्रपूरचा कार्तिकेय गुप्ता देशात प्रथम

नागपूर/प्रतिनिधी:

'आयआयटी'मधील प्रवेशासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रूरकीने घेतलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत चंद्रपूरच्या कार्तिकेय गुप्ताने देशात पहिला क्रमांक पटकावला. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे राहणारा कार्तिकेयने १०० पर्सेंटाइल मिळवले. या आधीही जेईई मेन परीक्षेत १०० पर्सेंटाइल मिळवून तो देशात १८वा,तर महाराष्ट्रात दुसरा आला होता. कार्तिकेयने यावर्षीच १२वीच्या परीक्षेत ९३.७ टक्के गुण मिळवले आहेत.

कार्तिकेयला जेईई अॅडव्हान्समध्ये ३६० पैकी ३३७ गुण मिळाले आहेत. त्याचे वडील चंद्रेश गुप्ता पेपर इंडस्ट्रीमध्ये मॅनेजर असून, आई पूनम गृहिणी आहेत. जेईई अॅडव्हान्स परीक्षा २७ मे रोजी झाली होती. देशभरातील इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये राष्ट्रीय कोट्यात प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षा घेतली जाते. यात उत्तीर्ण झालेल्यांपैकी यंदा एक लाख ६१ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी आयआयटी, एनआयटी, ट्रीपलआयटी या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षा दिली. यात ३८ हजार ७०५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये पाच हजार ३५६ मुलींचा समावेश आहे. या परीक्षेत मुंबई विभागातील शबनम सहाय ३७२ पैकी ३०८ गुण मिळवून मुलींमध्ये पहिली आली.
देशातील १० टॉपर
कार्तिकेय गुप्ता (महाराष्ट्र), हिमांशू गौरव सिंह (दिल्ली), अर्चित बुबना (दिल्ली), गिलेला आकाश रेड्डी (हैदराबाद), बत्तीपती कार्तिकेयन (हैदराबाद), निशांत अभंगी (दिल्ली), कौस्तुभ दिघे (महाराष्ट्र), थिवेश चंद्र एम (हैदराबाद), ध्रृवकुमार गुप्ता (दिल्ली) आणि शबनम सहाय (महाराष्ट्र).