कृषीवलचे मुख्य संपादक प्रसाद केरकर यांना देवर्षी नारद पुरस्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ मे २०१९

कृषीवलचे मुख्य संपादक प्रसाद केरकर यांना देवर्षी नारद पुरस्कार


। अलिबाग । वार्ताहर ।

विश्‍व संवाद केंद्रातर्फे नारद जयंती आणि नारद पुरस्कार समारोहाचे आयोजित करण्यात आले असून यानिमित्त कृषीवलचे मुख्य संपादक प्रसाद केरकर यांना प्रतिष्ठेचा मानल्या जाणार्‍या देवर्षी नारद पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
देवर्षी नारद हे त्रिलोकात मुक्त संचार करणारे, वार्ताप्रसार करणारे आद्य पत्रकार असल्याची विेश संवाद केंद्राची धारणा आहे. त्यामुळेच विश्‍व संवाद केंद्राच्या देशभरातील विविध केंद्रांमार्फत दरवर्षी नारद जयंतीला पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने मूल्याधिष्ठित पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांचा; तसेच पत्रलेखन स्पर्धेतील विजेत्या पत्रकारांचा सन्मान करण्यात येतो. गेली 21 वर्षे मुंबईत हा उपक्रम सुरु असून सुमारे पन्नासहून अधिक पत्रकारांना आजवर सन्मानित करण्यात आले आहे. यंदा हा सोहळा नारद जयंतीच्याच दिवशी, शनिवार, 18 मे रोजी संध्या. ठीक 6 वा. माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिट्यूटच्या पाचव्या मजल्यावरील बोर्डरूममध्ये आयोजित केला आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी माहिती आयुक्त, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर तर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार व थिंक महाराष्ट्रचे संपादक दिनकर गांगल उपस्थित राहणार आहेत. कुवळेकर यांच्या हस्ते पत्रकार सन्मान सोहळा पार पडेल; तर गांगल यांच्या हस्ते ‘पत्रसामर्थ्य’ अंकाचे प्रकाशन आणि पत्रलेखकांचा सन्मान केला जाईल. यावेळी ज्येष्ठ पत्रकार, तरुण पत्रकार, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार, सामाजिक माध्यमांतील लेखक; तसेच वृत्तपत्र छायाचित्रकार, अन्य भाषिक पत्रकार, महिला पत्रकार अशा विविध श्रेणीतील पत्रकारांचा मानधन, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रंथ देऊन सन्मान केला जातो. यावर्षी कृषीवलचे मुख्य संपादक प्रसाद केरकर, झी 24 तासचे वरिष्ठ राजकीय संवाददाता अमित जोशी, लोकसत्ताचे मुख्य उपसंपादक पंकज भोसले, मुंबई तरुण भारतचे मुख्य उपसंपादक निमेश वहाळकर, टीव्ही 9 च्या वृत्तनिवेदक निखिला म्हात्रे, स्तंभलेखक सोमेश कोलगे, सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार सचिन हरळकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे, दिलीप चावरे, किरण शेलार यांच्या निवड समितीने या नावांची निवड केली आहे. देवर्षी नारद जयंती समारंभात विविध प्रकाशनांत, नियतकालिकांत, वृत्तपत्रात पत्रलेखन करणार्‍या पत्रलेखकांचाही सन्मान करण्यात येत असतो. विश्‍व संवाद केंद्र, मुंबईतर्फे दरवर्षी पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. पत्रलेखनासाठी पाच-सहा विषय दिले जातात. या स्पर्धेसाठी राज्यभरातून तसेच गोव्यातूनही जी पत्रे येतात त्यांची छाननी करून पहिले तीन विजेते निवडले जातात. या पत्रलेखकांच्या पत्रांचा अंतर्भाव असलेल्या ‘पत्रसामर्थ्य’ ग्रंथाचे प्रकाशन या निमित्ताने केले जाते.
प्रतिष्ठेचा मानल्या जाणार्‍या देवर्षी नारद पुरस्काराचा बहूमान यापूर्वी वीणा देवधर, एल व्ही कामत, अरुण टिकेकर, संदीप आचार्य, दिनेश गुणे, शुभदा चौकर, सुधील जोगळेकर, स्व. निशिकांत तथा नाना जोशी, अंबरीश मिश्रा, स्व. भालचंद्र दिवाडकर, शुभांगी खापरे यांना देण्यात आला आहे.