जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा आढावा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मे २०१९

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा आढावा
चंद्रपूर, दि. 9 मे: दुष्काळाला समूळ नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील कामांचा तालुका निहाय आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभा आज दिनांक 9 मे 2019 रोजी नियोजन भवनात पार पडली.

या बैठकीत जिल्हा प्रशासनातील विविध यंत्रणेमार्फत जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सन 2017-18 व 2018-19 या वर्षातील 150 कोटींच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये कृषी विभाग, सिंचन विभाग, मनरेगा, जलसंधारण, जलसंपदा पाटबंधारे विभाग, वन विभाग, ग्रामीण पुरवठा विभाग अशा विविध विभागांच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच या विभागांची प्रस्तावित कामे, प्रगतीपथावर असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांवर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.

सोबतच कोणतीही अपूर्ण कामे रद्द न करता ती मुदतीत पूर्ण करण्यात यावी, कामे संथगतीने होत असल्यास उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराशी चर्चा करून त्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात. अपूर्ण कामांवर तालुकास्तरीय समितीने चर्चा करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील व विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.