धक्कादायक;चंद्रपुरात सावकाराने पेटवून दिलेल्या मायलेकांपैकी आईचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ मे २०१९

धक्कादायक;चंद्रपुरात सावकाराने पेटवून दिलेल्या मायलेकांपैकी आईचा मृत्यू

नागपुर/ललित लांजेवार:


7 मे रोजी चंद्रपुरातील एका अवैध सावकाराने कर्जदाराने वेळेवर कर्जाचे पैसे परत न केल्याने कर्जदाराच्या कुटुंबालाच पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.या प्रकरणातील जखमी
कल्पना हरीणखेडे यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला .त्या 60 % जळलेल्या होत्या, त्यांच्यावर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरु होता.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा पीयूष हरिणखेडे हा मेयो रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणातील जखमी मुलाला अजूनही उपचार घेत असलेल्या आईचा मृत्यू झाल्याची बातमी लपवल्या गेली आहे.
असे होते प्रकरण
७ मे रोजी  मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील सरकार नगर येथे हि घटना घडली होती.येथे राहणारे हरिश्चंद्र हरिणखेडे हे व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी अवैध सावकार जसबीर भाटीया उर्फ सोनू याच्याकडून तीन लाख रुपयांचं व्याजी कर्ज घेतलं होतं. यातील दोन लाख रुपयांची परतफेड हरिणखेडे यांनी केली होती. मात्र उर्वरित १ लाख रकमेतील ६० हजार रुपये आज देण्याचं ठरलं होतं. ते घेण्यासाठी आज जसबीर भाटीया हरिणखेडे यांच्या घरी गेला.आताच्या आता कर्ज पाहिजे असा तगादा त्याने लावला. रात्री ८ वाजेपरियंत कर्जाचे संपूर्ण पैसे परत करायचे ठरले असतांना मनात सुळ धरून पूर्ण नियोजित कट रचून आलेल्या भाटीयाने गाडीच्या डीक्कीतून २ पेट्रोल भरल्या बाटल्या काढत कोणाला काही समजायच्या आतच आई कल्पना व मुलगा पीयूष हरिणखेडे याच्या अंगावर पेट्रोल टाकत जिवंत पेटवून दिले.या घटनेत मुलगा तीस टक्के तरआई साठ टक्के जळाली.

घटना घडतच आरडा ओरड सुरु झाली. घराला लागलेली आग हि शेजाऱ्यानी आटोक्यात आणली व जखमींना मदत केली .या जीव घेण्या हल्ल्यात लागलेल्या आगीत हरिणखेडे यांचे संपूर्ण घरातील सामान जळाले. या घटनेत जखमी झालेल्या कल्पना व पीयूष हरिणखेडे यांच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जसबीर भाटीया हा अवैधरीत्या सावकारी करतो. पैसे देण्याचं कबूल केल्यानंतरही त्यानं हा जीवघेणा केल्यानं त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी,अशी मागणी हरिणखेडे कुटुंबानं केली आहे.या घटनेमुळे आता शहरातील अनेक अवैध सावकारांचे धाबे दणाणले असल्याचे समजते आहे.

कल्पना हरीणखेडे यांच्या मृत्यूने चंद्रपुरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यामुळे आता अश्याअवैध सावकारावर संबंधित अधिकारी काय कारवाई करतात व अश्या अवैध सावकारावर संबंधित विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

घटना घडल्यावर पीडितांना वेळेवर उपचार मिळायला हवा होता, खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांचेवर उपचारव्यवस्थित झाला नाही, त्या रुग्णालयात जळलेल्या रुग्णावर उपचार होणार अशी व्यवस्था नव्हती, याला पूर्णतः जबाबदार प्रशासनच आहे, आम्ही या प्रकरणावर जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटून तात्काळ कारवाई करण्यासंबंधीची निवेदन देऊ
किशोर जोरगेवार, अध्यक्ष , यंग चांदा ब्रिगेड

आरोपिवर तात्काळ कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायला हवं, व आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी
- संदीप गिर्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख

जिल्ह्यात व शहरात अवेध सावकारांच्या पीडितांची संख्या खूप जास्त आहे, यावर प्रशासनाने कठोर पावले आधीच उचलायला हवी होती, जर कारवाई झाली असती तर कल्पना हरिनखेडे यांना आपला जीव गमवावा लागला नसता, आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अवेध सावकार यांचेवर कडक कारवाई करून, त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी शासनाला करणार आहोत, जेणेकरून अश्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही.

 प्रतिमा ठाकूर, मनसे शहराध्यक्ष