कोराडी वीज केंद्राला सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान, डिझाईन व अभियांत्रिकीचा राष्ट्रीय पुरस्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मे २०१९

कोराडी वीज केंद्राला सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान, डिझाईन व अभियांत्रिकीचा राष्ट्रीय पुरस्कार

नागपूर/प्रतिनिधी:

भांडेवाडी नागपूर येथील सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर प्रकल्पाच्या सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान, डिझाईन व अभियांत्रिकी या संवर्गातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय पुरस्कार, महानिर्मितीच्या ३x६६० मेगावाट स्थापित क्षमतेच्या कोराडी औष्णिक विद्यूत केंद्राला मिळाला. 

३ मे २०१९ रोजी मिशन एनर्जी फाउंडेशनद्वारे “जल संवर्धन २०१९” या  राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ताज व्हीवांटा नवी दिल्ली येथे करण्यात आले. माजी ऊर्जा सचिव भारत सरकार अनिल राजदान व मिशन एनर्जी फाउंडेशनचे संचालक अश्विन कुमार खत्री यांचे शुभहस्ते हा पुरस्कार कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे आणि कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ राजेश चिव्हाणे यांना प्रदान करण्यात आला. 


सदर पुरस्कार लक्षणीय आहे कारण या संबंधीची आकडेवारी परस्पर केंद्रीय विद्युत प्राधिकरण यांचे कडून घेण्यात आली आहे व मान्यवर परीक्षकांच्या शिफारशीनुसार याची निवड करण्यात आलेली आहे. देशभरातील बहुतांश सार्वजनिक, शासकीय, खाजगी वीज केंद्रांचा या स्पर्धेमध्ये सहभाग होता. विशेषत: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन सारख्या अग्रमानांकित संस्थेचा यामध्ये सहभाग होता. 


नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा कोराडी वीज केंद्रात राख वहन आणि कंडेन्सर कुलिंग करीता वापर करण्यात येतो व याकरिता १३० दशलक्ष घन लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. देशातील हा अभिनव असा पहिलाच पथदर्शी प्रकल्प आहे. 


सदर परिषदेत राजेश चिव्हाणे यांनी भांडेवाडी सांडपाणी प्रकल्पाची प्रथम, द्वितीय आणि त्रिस्तरीय प्रक्रियेची तांत्रिक माहिती संगणकीय सादरीकरणातून मांडली. तसेच वने, पर्यावरण व वातावरण बदल मंत्रालय भारत सरकारच्या संवैधानिक नियमानुसार कोराडी वीज केंद्राने जल संवर्धन विषयक अधिकाधिक पाणी बचत व पुनर्वापरासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची उपस्थितांना माहिती दिली. 

कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजकुमार तासकर यांनी महानिर्मिती वरिष्ठ व्यवस्थापनाचे आणि संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल त्यांचे  विशेष आभार मानले आहे. सोबतच कोराडी वीज केंद्राचे अधिकारी-विभाग प्रमुख-अभियंता-तंत्रज्ञ-कर्मचारी व रहिवाश्यांनी पाणी बचतीसाठी व पुनर्वापरासाठी घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित असल्याचे राजकुमार तासकर यांनी सांगितले.