मान्सुमपुर्व तयारीसाठी महावितरण लागली कामाला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ मे २०१९

मान्सुमपुर्व तयारीसाठी महावितरण लागली कामाला

नागपूर/प्रतिनिधी:

मे महिन्याचा उत्तरार्ध जवळ येऊन ठेपला असून नागपूरसह संपुर्ण विदर्भात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे, येत्या काही दिवसांत उनाच्या तडाक्यासोबतच अधून-मधून येणा-या अवकाळी पाऊस व त्यानंतरच लगेचच सुरु होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरणने विविध ठिकाणी मान्सुमपुर्व देखभाल व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. 

साधारणत: मे महिन्याच्या उत्तरार्धात नागपूरसह संपुर्ण विदर्भात अंगाची लाही-लाही करणारे तापमान असते, त्यातच अधून-मधून वीजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याच्या घटनाही या काळात होत असल्याचे मागिल काही वर्षातील अनुभव असून तसा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.
 महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणा-या बदलाचा प्रतिकुल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो व पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होत असतो. यामुळे ऊन्हाळा व त्यानंतर लगेच सुरु होणारा पावसाळा हा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरण कामाला लागली आहे. 

महावितरणची बहुतांश विद्युत यंत्रणा उघडयावर असल्याने वाढलेल्या झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असतात, या फ़ांद्या व वेली काही ठिकाणी तारांवर घासत असतात व यामुळे विद्युत यंत्रणेची क्षती होत असते, ही हानी टाळण्याकरिता नागपूर परिक्षेत्रातील सर्व संबंधितांनी आपापल्या भागातील यंत्रणेची या दॄष्टीने चाचपणी करून गरजेनुसार संबंधितांची पुर्वपरवानगी घेऊन हया फांद्या झाटून घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. 

वीज तारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, पताका, तोरण, फ़्लेक्स बॅनर्स, प्लास्टिक झेंडे याचाही फटका यंत्रणेला बसत असतो, यामुळे वीजपुरवठा खंडीत होतो. वीज वाहिन्यांत अडकलेले पतंग, मांजा, कपडयांचे तुकडे किंवा तत्सम काहीही तारांवर असेल तर ते वेळीच काढून टाकण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत.

 याशिवाय सैल झालेले गार्डींग व स्पॅन घट्ट करणे, दोन खांबांमधील झोल पडलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करण्याचे कामही मोठया प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. वीज उपकेंद्रातील रोहीत्रांमधील तेलाची योग्य पातळी राखणे तसेच ब्रिदरमधील सिलीका जेल पिंगट झाले असल्यास ते बदलण्यात येत आहे. वीजवितरण यंत्रणेत अर्थिंगचे महत्व अधिक आहे, याकरिता रोहीत्रांचे अर्थिंग मजबूत करणे, पोल, वितरण पेट्या, फिडर पिलर्स, मिनी फिडर पिलर्स या सर्वांचे अर्थिंग सुस्थितीत करण्याचे कामही मोठया प्रमाणात सुरू करण्यात येत आहे. 

ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणतर्फ़े दर आठवड्यात ठाराविक दिवशी विविध वाहिन्यांवर देखभाल व दुरुस्तीची ही कामे करण्यात येत असतात, यावेळी ग्राहकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
महावितरणची एसएमएस सेवा
वीज यंत्रणा देखभाल व दुरुस्तीसाठी प्रस्तावित वीज खंडित करण्याची (आऊटेज) पुर्वसुचना ग्राहकांना मिळावी सोबतच मीटर रिडींग, वीज देयक, वीजपुरवठा खंडित, बीलभरण्याची मुदत आदीबाबत माहिती देण्यासाठी एसएमएस देण्याची सुविधा महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली असल्याने वीज ग्राहकाने एसएमएस साठी MLANG <ग्राहक क्रमांक> टाईप करून 9225592255 या क्रमांकावर मेसेज पाठवून आपला मोबाईल क्रमांक नोंदवायचा आहे, सोबतच महावितरणचे www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून, महावितरण मोबाईल ॲप वरून अथवा महावितरण कॉल सेंटरच्या 18002333435, 18001023435 किंवा 1912 या क्रमांकावरूनही मोबाईल क्रमांकाची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरच एसएमएस सेवा उपलब्ध होत असल्याने, ग्राहकांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.