लाचेच्या सापळ्यात नगराध्यक्षाला अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ मे २०१९

लाचेच्या सापळ्यात नगराध्यक्षाला अटक

वाडीत राजकीय भूकंप,सूड भावनेतून बळी घेतल्याचा पत्नी व भावाचा  आरोप 
 कंत्राटदाराने २० हजार रुपयाचा दिला  बंद लिफाफा
वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे 
वाडी नगर परिषदचे नगराध्यक्ष प्रेम आत्माराम झाडे  यांना  शुक्रवार १७ मे रोजी  सकाळी १० वाजता लाचलुचपत विभागाने २० हजार रुपयाचा बंद लिफाफा  घेताना झाडे यांच्या निवासस्थानी रंगेहात पकडल्याने परिसरात एकच खळबळ उडवून अनेक राजनैतिक तर्कवितर्क काढल्या जात असून सूड भावनेचा मोठा राजकीय भूकंप झाल्याने याचे दूरगामी परिणाम होणार असल्याची नागरीकांमध्ये चर्चा आहे . 

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार एका खाजगी संस्थेकडून वाडी नगर परिषदेला तीन अभियंता नेमले होते त्यांचे मागील तीन महिन्यापासून वेतन थकीत होते,ते काढण्यासाठी संस्थेनी नगराध्यक्ष प्रेम झाडे याना विनंती केली असता त्यांनी २४ हजार रुपयांची  लाच मागितली परंतु संबंधित कंत्राटदाराला लाच दयायची नसल्याने त्याने गुरुवार १६  मे रोजी लाचलुचपत विभागाकडे  तक्रार केली.त्यापैकी  २० हजार रुपयाचा  बंद लिफाफा मधील रक्कम घरी स्वीकारतात लाचलुचपत विभागाने सापळा रचल्यानुसार प्रेम झाडे यांना रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली. तर शहरात या प्रकरणामुळे चर्चेला उधाण येऊन वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात असून कंत्राटदाराने प्रेम झाडे यांना फसविले आहे,पैशाचे पॉकेट स्वीकारताना त्यामध्ये काय आहे याची कुठल्याही प्रकारची माहिती झाडे यांना माहिती नव्हती .तसेच संबंधित ठेकेदारासोबत  आर्थिक देवाण-घेवाण बाबत कुठलीही तडजोड झाली नव्हती अशीही माहिती पुढे आली आहे .

परंतु पक्षांतर्गत ठरलेल्या करारानुसार प्रेम झाडे यांचा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ १९ फेब्रुवारी रोजी  संपला असता पक्षाने त्यांना राजीनामा देण्याच्या सूचना दिल्यानंतरही त्यांनी महामंत्री पदाचा राजीनामा दिला परंतु ते अध्यक्षपद सोडायला तयार नव्हते यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व वरिष्ठ पातळीवरुन त्यांना आदेशही आला परंतु त्यांनी राजीनामा दिला नाही त्यामुळे अशा प्रकारचे षडयंत्र रचून त्यांना बळीचा बकरा बनविल्याचा आरोप त्यांची  पत्नी प्रज्ञा झाडे यांनी केला.सकाळी १०  वाजतापासून झाडे यांच्या बंगल्याची कसून कार्यवाही सुरू असून प्रेम झाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात चौकशी सुरू केली आहे.प्रेम झाडे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सर्व वॉर्डाना निधी वाटतांना कोणत्याही प्रकारचा पक्षभेद न करता सारखा निधी देत असल्याने पक्ष व विपक्षाचे नगरसेवक त्यांच्या सोबत राहत होते .ही गोष्ट या भागाचे आमदार समीर मेघे यांना खटकत असल्याने झाडे  यांचा काटा काढण्यासाठी हे प्रकरण घडवून आणल्याचा आरोप शिवसेनेचे तालुका उपप्रमुख , पं .स. चे माजी उपसभापती रूपेश झाडे  यांनी केला आहे .
उपरोक्त कारवाई  ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्रचे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे ,नागपूर परिक्षेत्रचे अपर पोलिस अधिक्षक,राजेश दुद्लवार , नागपूरचे पोलीस उपअधिक्षक विजय माहुलकर  यांच्या मार्गदर्शनात तसेच कारवाई पथकात पोलिस उपअधीक्षक महेश चाटे,भंडारा पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी ,सचिन हलमारे,अश्विन गोस्वामी,पराग राऊत , शेखर देशकर,सुनिल हुकरे ,दिनेश धार्मिक आदींचा समावेश होता. 
.