अंतराळातून चंद्रपूर गायब;नागपुरात इको-प्रो चमूचा सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ मे २०१९

अंतराळातून चंद्रपूर गायब;नागपुरात इको-प्रो चमूचा सत्कार

नागपूर/प्रतिनिधी:

 वनमंत्री चंद्रपूरचे असताना गेल्या तीन वर्षांत २५० वाघ आणि ३६७ बिबट मारले गेले. दुसरा देश असता तर आतापर्यंत त्यांचा राजीनामा मागितला असता. मात्र आपल्याकडे तसे झाले नाही. सरकारला यासाठी लाज वाटली पाहिजे, असा प्रहार ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी गुरुवारी येथे केला. .

चंद्रपूरचा परकोट किल्ला तब्बल ७०० दिवस अभियान राबवून स्वच्छ करणाऱ्या इको प्रो संस्थेचे बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात 'महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन संदेश परिक्रमा' महाराष्ट्रदिनापासून सुरू करण्यात आली आहे. ही परिक्रमा यात्रा दुसऱ्या दिवशी नागपुरात पोहोचली असून, त्यानिमित्ताने वनराई फाउंडेशनतर्फे बंडू धोतरे आणि त्यांच्या चमूचा सत्कार सोहळा श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात द्वादशीवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ वन्यजीवप्रेमी गोपाळ ठोसर उपस्थित होते. प्रास्ताविक स्वानंद सोनी यांनी केले. 

दादासाहेब कन्नमवार मुख्यमंत्री असताना एका दिवसात एक लाख वृक्ष लावण्याचा विक्रम झाला होता. मात्र, आता वृक्ष लावण्याची आकडेवारी सादर करून स्पर्धा केली जात आहे. मात्र, किती वृक्ष लागले आणि जगले, याचे ऑडिटही व्हायला हवे. मुळात राजकीय स्वप्न आणि मानवाचा स्वार्थ यातून संघर्ष उत्पन्न झाला असून नागपुरात शहराच्या सौंदर्यीकरणासाठी शंभर व दीडशे वृक्षांचा बळी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे असले 'ड्रीम सिटी' कशासाठी, असा परखड सवाल डॉ. गिरीश गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.

गड, किल्ले महाराष्ट्राचा  अभिमान आहेत. मात्र, छत्रपतींच्या समाधी पुढील वाघ्या कुत्र्याची समाधी उचलून जंगलात फेकली जाते आणि लोकांच्या इशार्‍या नंतरतीनच दिवसांत शोधून ती पुन्हा उभारली जाते, ही अशोभनीयगोष्ट आहे. प्रदूषणाची तीव्रताइतकी वाढली आहे, अंतराळातून चंद्रपूर दिसत नाही. सॅटेलाइट
मॅपमध्ये चंद्रपूरवर काळा डाग दिसतो, तो धूर आणि प्रदूषणाचाअसून जगात तिसऱ्या युद्धाची नांदी
कधीचीच बाजली आहे. मानवाने निसर्गाविरुद्ध तिसरे महायुद्धपुकारले असून मानव आक्रमक तर
निसर्ग शांत आहे. हे युद्ध थांबवायचे असेल तर मानवाने निसर्गाच्या बचावाचा पवित्रा घेण्याचे आवाहन
प्रा. द्वादशीवार यांनी यावेळी  केले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी  जर्मनीत ग्रीन पार्टी उभारली गेली
आणि प्रस्थापितांच्या विरोधात या  पक्षाचे उमेदवार निवडूनही येत  आहेत. त्याच धर्तीवर भारतातही
प्रदूषणाच्या विरोधात राजकीय चळवळ उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. संचालन अजय पाटील
यांनी केले, तर आभार नीलेश खांडेकर यांनी मानले.