खापरखेडा वीज केंद्राला “शून्य पाणी निसरा केंद्र” म्हणून राष्ट्रीय पारितोषिक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ मे २०१९

खापरखेडा वीज केंद्राला “शून्य पाणी निसरा केंद्र” म्हणून राष्ट्रीय पारितोषिक

नागपूर/प्रतिनिधी:

५०० मेगावाट व त्याखालील औष्णिक वीज केंद्र संवर्गात पाण्याच्या शून्य निसऱ्याकरीता खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राला नुकतेच राष्ट्रीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. ३ मे २०१९ रोजी  ताज व्हीवांटा द्वारका नवी दिल्ली येथे मिशन एनर्जी फाउंडेशन या संस्थेद्वारे पाणी संवर्धन विषयक आयोजित स्पर्धेत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 

देशभरातील शासकीय, निमशासकीय, खाजगी औष्णिक विद्युत केंद्रांनी यामध्ये सहभाग घेतला. पाणी संवर्धन विषयक हि स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. वारेगाव राख बंधाऱ्यातील राख मिश्रित  पाण्याचा पुनर्वापर तसेच खापरखेडा येथील ३० वर्षे जुन्या संचांतून वीज उत्पादन घेताना औद्योगिक प्रक्रियेतून बाहेर निघणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यात खापरखेडा वीज केंद्राने उल्लेखनीय असे कार्य केले आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेकरिता आवश्यक याबाबतची सर्व आकडेवारी मिशन एनर्जी फाउंडेशनने केंद्रीय विद्युत प्राधिकरण येथून परस्पर घेतली आहे. 

एकीकडे वाढते तापमान, मोठ्या प्रमाणातील शहरीकरण तर पावसाच्या दुर्भिक्षामुळे जमिनीतील पाण्याची पातळी सातत्याने घटत आहे. एकूणच, पाण्याचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे. अश्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर, पुनर्वापर करणे हि काळाची गरज बनली आहे. 

खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी पाण्याचे अनन्यसाधारण महत्व ओळखून वेळीच पुढाकार घेतला व सांघिक भावनेतून तसेच संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे आणि महानिर्मिती मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली सुयोग्य नियोजन करून खापरखेडा येथे जनजागृती केली. पाण्याचा शून्य निसरा करण्याचे दृष्टीने अल्प/दीर्घकालीन नियोजन, पाणी काटकसर/बचत, पाणी पुनर्वापर इत्यादी योजना प्रभावी राबविल्याचे हे फलित असल्याचे मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या पारितोषिकाचे श्रेय त्यांनी खापरखेडा येथील अधिकारी-अभियंते-तंत्रज्ञ-कर्मचारी-कंत्राटदार,कंत्राटी कामगार व रहिवाश्यांना दिले आहे.