सर्वोत्तम कामगिरीत पारस वीज केंद्राचा देशात सहावा क्रमांक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ मे २०१९

सर्वोत्तम कामगिरीत पारस वीज केंद्राचा देशात सहावा क्रमांक

९६.७८ टक्के भारांक
 मागील सात महिन्यांपासून झिरो कोल डेमरेज
संचालक पाच सूत्रीची किमया
पारस (अकोला)/प्रतिनिधी: 

 केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १५ औष्णिक विद्युत केंद्रांची नुकतीच यादी जाहीर केली असून त्यामध्ये महानिर्मितीच्या २x२५० मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा सहावा क्रमांक आहे. यापूर्वी सन २०१५-१६ मध्ये १८ वा तर एप्रिल २०१६ ते सप्टेंबर २०१६ ला ७ व्या क्रमांकावर पारस वीज केंद्र होते. 

सर्वोत्तम कामगिरीत देशातील सार्वजनिक, शासकीय आणि खाजगी औष्णिक विद्युत केंद्रांचा समावेश आहे. ज्यामध्ये अमरकंटक वीज केंद्र, मध्यप्रदेश (प्रथम-१००.३७ भारांक), एन.टी.पी.सी., तालचर ओरिसा (द्वितीय-९८.९६ भारांक), एन.टी.पी.सी., सिपत बिलासपुर छत्तीसगढ(तृतीय-९७.१६ भारांक), बाक्रेश्वर पश्चिम बंगाल (चतुर्थ-९७.०७ भारांक), ससान सिंगरोली मध्यप्रदेश (पाचवे-९६.८४ भारांक) तर महानिर्मिती पारस वीज केंद्र (सहावे-९६.७८ भारांक).

सर्वोत्तम कामगिरी करणारे वरील तालचर,सिपत,ससान हि तीन औष्णिक विद्युत केंद्रे कोळसा खाणीच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे कोळसा वहन खर्चात मोठी बचत होते व कोळसा सहज उपलब्ध होतो.  पारस वीज केंद्र मात्र, कोळसा खाणीपासून किमान ३०० किलोमीटर दूर अंतरावर आहे. पारस वीज केंद्राला वेकोलि, महानदी कोल फिल्ड्स आणि एस.ई.सी.एल. च्या खाणींतून कोळसा पुरवठा करण्यात येतो.  

मागील सात महिन्यांपासून सातत्याने शून्य कोळसा डेमरेज असून ११ मे २०१९ पर्यंत सुमारे २८४ रेक्स कोळसा, डेमरेज शुल्काविना उतरवून सांघिक कार्याची ताकद दाखवून दिली आहे. स्थापित क्षमतेनुसार येथील दोन्ही वीज संचातून महत्तम वीज उत्पादन घेण्यात येते. विविध तांत्रिक समस्यांवर वेळेत मात करून येथील कुशल मनुष्यबळाने आपल्या तांत्रिक ज्ञानाचा/कौशल्याचा परिचय दिला आहे. 

संचालक पाच सूत्री कार्यक्रमा अंतर्गत कमी कोळसा वापर, झिरो कोल डेमरेज, परिसरातील वातावरण सुधारणा व नवनवीन संकल्पना राबविण्यात येत असल्याने पारस वीज केंद्राची उत्तरोत्तर यशस्वी वाटचाल होत आहे आणि महानिर्मितीमध्ये क्रमांक एक चे विद्युत केंद्र म्हणून या केंद्राचा नावलौकिक आहे. 

मुख्य अभियंता डॉ.रवींद्र गोहणे यांचे नेतृत्वाखाली पारस वीज केंद्राने महानिर्मितीचा सर्वोत्कृष्ट पर्यावरण पुरस्कार, जलसंवर्धन विषयक कार्यक्षम पाणी वापरासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकाविला आहे. गुणवंत अभियंता/कर्मचारी पुरस्कार योजना, गुणवत्ता मंडळ संकल्पना, वीज उत्पादनासोबतच वीज केंद्र परिसरात विविध ठिकाणी सुंदर हिरवेगार बगीचे, वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. मनुष्यबळाच्या सुदृढ आरोग्यासाठी पॉवर जिम उभारण्यात आली आहे व क्रीडा स्पर्धेकरिता आवश्यक ते प्रोत्साहन देण्यास मुख्य अभियंत्यांचा नेहमीच पुढाकार असतो. 

महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग, संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(वित्त) संतोष अंबेरकर, संचालक(खनिकर्म) पुरुषोत्तम जाधव, संचालक(प्रकल्प) वी. थंगपांडियन तसेच वरिष्ठ व्यवस्थापनाने टीम पारसचे नुकतेच मुख्यालय मुंबई येथे राजस्तरीय मासिक आढावा बैठकीत विशेष अभिनंदन केले आहे.
मुख्य अभियंता डॉ. रविंद्र गोहणे, उप मुख्य अभियंता मनोहर मसराम, अधिक्षक अभियंता रूपेन्द्र गोरे यांनी सर्व अधिकारी, विभाग प्रमुख,अभियंता, तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले.  आगामी काळात पारस वीज केंद्र देशात क्रमांक एकचे सर्वोत्तम कामगिरी करणारे वीज केंद्र होईल यादृष्टीने प्रत्येकाने आपले योगदान वाढविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पारस वीज केंद्राचे मुख्य अभियंता डॉ.रवींद्र गोहणे यांनी केले.